वयोमर्यादा वाढीत विद्यापीठाचे हितच!
By Admin | Updated: October 20, 2015 02:21 IST2015-10-20T02:21:29+5:302015-10-20T02:21:53+5:30
कुलगुरू म्हणून मला मुदतवाढ दिली जावी, अशी विनंती मी सरकारला केलेली नाही. माझी सरकारशी त्याविषयी बोलणीही झालेली नाहीत. सरकारच्याच इच्छेनुसार कुलगुरू

वयोमर्यादा वाढीत विद्यापीठाचे हितच!
सद्गुरू पाटील ल्ल पणजी
कुलगुरू म्हणून मला मुदतवाढ दिली जावी, अशी विनंती मी सरकारला केलेली नाही. माझी सरकारशी त्याविषयी बोलणीही झालेली नाहीत. सरकारच्याच इच्छेनुसार कुलगुरू पदावरील व्यक्तीचे निवृत्ती वय ७० वर्षे करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हा बदल गोवा विद्यापीठाच्यादृष्टीने हिताचाच आहे, असा दावा गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश शेट्ये यांनी सोमवारी केला.
कुलगुरू सेवावाढ विषयाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या वादाविषयी या प्रतिनिधीने शेट्ये यांच्याशी संवाद साधला. शेट्ये हे प्रथमच या विषयावर सविस्तर बोलले. शेट्ये म्हणाले की, गोवा विद्यापीठाला आतापर्यंत जे कुलगुरू लाभले, त्यांना पाच वर्षांचाच कालावधी मिळाला. वय वर्षे ६५ ही अट असल्यामुळे मला (अजून तरी) तीन वर्षांचा कालावधी मिळाला. सर्व केंद्रीय विद्यापीठांचे कुलगुरू तसेच आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांची निवृत्तीची वयोमर्यादा आता ७० वर्षे झालेली आहे. गोवा सरकारने केंद्रीय विद्यापीठांप्रमाणेच गोवा विद्यापीठाच्याही कुलगुरूंचे निवृत्ती वय हे ७० वर्षे करावे,
अशी सूचना केली होती. आम्ही त्या सूचनेचे पालन करून आवश्यक कायदेशीर
दुरुस्त्या करत आहोत.
शेट्ये म्हणाले की, गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाने कुलगुरूंचे निवृत्ती वय ६५ वरून ७० वर्षांपर्यंत वाढविण्यावर शिक्कामोर्तब केले. मला स्वत:ला आता तीन वर्षांनंतरही आणखी दोन वर्षांची मुदतवाढ द्यावी की देऊ नये, ते सरकार ठरवील. मी काही मागितलेले नाही. मला सरकारने किंवा कुलपतींनीही (राज्यपाल) त्याविषयी काही विचारलेले नाही. अगोदर सरकारचा निर्णय होऊ द्या. मग आणखी दोन वर्षे कुलगुरू म्हणून राहावे की राहू नये, त्याविषयीचा निर्णय मी घेईन. स्वीकारावे
की नाकारावे, याचा निर्णय घेण्याचे
स्वातंत्र्य मला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शेट्ये यांनाच पुढील दोन वर्षे कुलगुरूपदी ठेवण्याचे तत्त्वत: ठरविले
आहे. मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिकपणे ‘लोकमत’शी बोलताना हे वृत्त खरे असल्याचे सांगितले.