४६व्या इफ्फीचे ‘झकास’ उद्घाटन
By Admin | Updated: November 21, 2015 02:05 IST2015-11-21T02:05:57+5:302015-11-21T02:05:57+5:30
सद्गुरू पाटील ल्ल पणजी ‘माय नेम इज लखन...’ आणि ‘धक धक करने लगा...’ या दोन गाण्यांच्या तालावर अभिनेता अनिल कपूर याने व्यासपीठावर नृत्य सादर केले

४६व्या इफ्फीचे ‘झकास’ उद्घाटन
सद्गुरू पाटील ल्ल पणजी
‘माय नेम इज लखन...’ आणि ‘धक धक करने लगा...’ या दोन गाण्यांच्या तालावर अभिनेता अनिल कपूर याने व्यासपीठावर नृत्य सादर केले आणि त्या तालावर प्रेक्षागृहातील हजारो प्रेक्षक उत्स्फूर्तपणे थिरकले. ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात शुक्रवारी सायंकाळी शानदार उद्घाटन झाले व त्या वेळी अनिल कपूरचे ‘झकास’ नृत्यच वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली, केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राज्यपाल मृदुला सिन्हा, गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष दामोदर नाईक आदींच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे अनिल कपूर यांच्या हस्ते समई प्रज्वलनाने इफ्फीचे उद्घाटन करण्यात आले. ३० वर्षांपूर्वी गाजलेला अनिल कपूरचा ‘मिस्टर इंडिया’ चित्रपट भारतीय प्रेक्षक अजूनही विसरलेले नाहीत. यावरून भारतीय चित्रपटांची ताकद कळते, असे ज्युरी मंडळाचे अध्यक्ष शेखर कपूर यांनी नमूद केले व अनिल कपूरलाही दाद दिली. गेली ४0 वर्षे अनिल कपूर चित्रपटांत काम करत आहे. १९७८ साली त्याने पहिला चित्रपट केला होता; मात्र अजूनही तो जुना किंवा वृद्ध झालेला नाही, असे केंद्रीय मंत्री जेटली आपल्या भाषणात म्हणाले. भारतीय चित्रपटांनी कला क्षेत्रातील बुद्धिमत्तेचे प्रभावीपणे प्रकटीकरण केले आहे. भारतीय चित्रपटांनी उत्तुंग भरारी मारली असून इफ्फीने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे, असे जेटली म्हणाले.
मुख्यमंत्री पार्सेकर यांचेही या वेळी भाषण झाले. भारतीय चित्रपटांनी माझ्यावरदेखील प्रभाव टाकला आहे. चित्रपट हे शिक्षणाचेही माध्यम आहे. गोव्याच्या भूमीत इफ्फीनिमित्त जगभरातून आलेल्या मंडळींनी येथील चित्रपटांसोबतच गोमंतकीय पाहुणचाराचा आस्वाद घ्यावा. इफ्फीचा दर्जा दरवर्षी वाढत राहावा म्हणून शक्य ते सर्व काही राज्य सरकार करील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव सुनील अरोरा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संरक्षणमंत्री पर्रीकर व केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते शेखर कपूर व ज्युरी मंडळाचा गौरव करण्यात आला. आयुषमान खुराना व आदिती राव हैदरी यांनी सूत्रनिवेदन केले. ‘लिजेंड्स आॅफ इंडियन सिल्वर स्क्रिन’ या पुस्तकाचे जेटली यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेत्री देविका भिसे उपस्थित होते. (खास प्रतिनिधी)