लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शनिवारी मुसळधार पावसाने दैना उडवली. राज्यभर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या १२ तासांत १ इंच पावसाची नोंद झाली आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर असाच राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
शनिवारपासून जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेकडून देण्यात आला होता. हा अंदाज सार्थ ठरवताना काल सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला. विशेषतः दक्षिण गोव्यात सासष्टी, मुरगाव, काणकोण, केपे, सांगे, धारबांदोडा या भागात जोरदार पाऊस पडला. वाडे-वास्को येथे दरड कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तर काही ठिकाणी झाडे रस्त्यावर पडून वाहतूक कोंडी झाल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली आहे.
जुलै महिन्याची सुरुवातच जोरदार पावसाने झाली. आतापर्यंत या महिन्यात १९ दिवसांत ३२ इंच इतका पाऊस पडला आहे. अजून राहिलेल्या १२ दिवसांत पावसाचा जोर असाच राहिल्यास यंदाचा जुलै महिना विक्रमी पाऊस देणारा महिना ठरणार आहे. जून महिन्यात ३० इंच पाऊस पडला होता. आतापर्यंत सर्वाधिक ८८ इंच इतका पाऊस धारबांदोड्यात झाला आहे.
आतापर्यंत सरासरी पाऊस हा ६२ इंच इतका नोंदवला आहे. अजून जुलै महिन्याचे ११ दिवस बाकी आहेत. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत चांगला पासून पडल्यास मान्सून इंचाचे शतकही गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत सांगेत ८२ इंच आणि त्यानंतर वाळपई येथे ८१ इंच इतका पाऊस नोंदवला आहे.
पाच दिवस 'यलो अलर्ट'
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै रोजी सुरू होत आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, अधिवेशन काळात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, आजपासून २५ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी ५० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वारा वाहण्याची शक्यता असल्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.