हल्लेखोरांना त्वरित अटक करा
By Admin | Updated: February 16, 2015 02:10 IST2015-02-16T02:10:15+5:302015-02-16T02:10:15+5:30
पर्ये : प्राणिमित्र अमृतसिंग, गोरक्षक हनुमंत परब व वासुदेव झरेकर यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा सूचक इशारा असून कार्यकर्त्यांवर होणारे

हल्लेखोरांना त्वरित अटक करा
पर्ये : प्राणिमित्र अमृतसिंग, गोरक्षक हनुमंत परब व वासुदेव झरेकर यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा सूचक इशारा असून कार्यकर्त्यांवर होणारे हे हल्ले वेळीच न रोखल्यास राज्यात अराजकता पसरेल. गृह खात्याने या हल्ल्याची गंभीर दखल घेत हल्लेखोरांना त्वरित अटक करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केरी, सत्तरी येथे रविवारी झालेल्या निषेध सभेत केली.
पर्ये पत्रकार मंडळातर्फे केरी येथील जुने बसस्थानक परिसरात ही निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर सनातनचे कार्यकर्ते सोमनाथ पै, मानवी हक्क कार्यकर्ते श्याम नाईक, मंडळाचे अध्यक्ष नीलेश शेटकर तसेच सत्तरी जागृती मंचचे विश्वेश परोब व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
केरकर पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले चिंताजनक असून समाजाने याबाबत सजग असायला हवे. सर्वस्व पणाला लावून वावरणारे कार्यकर्ते समाजहितासाठीच झटत असतात याचे भान सगळ््यांनी ठेवायला हवे. तसेच या घटनेकडे धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता हल्लेखोरांचा सर्व स्तरांतून निषेध व्हायला हवा, असे ते म्हणाले.
विश्वेश परोब यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करून पोलिसांच्या आशीर्वादाने सत्तरीत वाढत चाललेल्या हल्ले, जुगार आदी गैरप्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेळी श्याम नाईक, पांडुरंग गावस इत्यादींनी विचार मांडले.
आरंभी मंडळाचे अध्यक्ष नीलेश शेटकर यांनी स्वागत करून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. सूत्रसंचालन दशरथ मोरजकर यांनी केले. शेवटी त्यांनीच आभार मानले.