दलालांची भारतीयत्व जपणारी चित्रशैली

By Admin | Updated: January 19, 2016 17:14 IST2016-01-19T15:22:23+5:302016-01-19T17:14:53+5:30

दीनानाथ दामोदर दलाल यांच्या कुंचल्याची कमाल पणजी येथील संस्कृती भवनात लागलेल्या त्यांच्या चित्रंच्या प्रदर्शनात २४ जानेवारीपर्यंत पाहाता येईल

Illustrations of philanthropy | दलालांची भारतीयत्व जपणारी चित्रशैली

दलालांची भारतीयत्व जपणारी चित्रशैली

>सौंदर्य कुंचला : कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे दीनानाथ दलालांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्रंचे प्रदर्शन
 
- श्रीधर कामत बांबोळकर (पणजी)
दीनानाथ दामोदर दलाल यांच्या कुंचल्याची कमाल पणजी येथील संस्कृती भवनात लागलेल्या त्यांच्या चित्रंच्या प्रदर्शनात पाहायला मिळते. हे प्रदर्शन 24 जानेवारीपर्यंत पाहाता येईल. 
दलालांचे संपूर्ण चित्रसंचित कौशल्यपूर्ण आहे. त्यांची रेखाचित्रे, रंगचित्रे, व्यक्तिचित्रे आणि निसर्गचित्रे पाहिल्यास त्यांनी सातत्याने केलेला सराव आणि घेतलेल्या प्रशिक्षणामुळे हे कौशल्य त्यांनी प्राप्त केल्याचे जाणवते. कलाशिक्षणातून प्राप्त केलेल्या कौशल्यामुळे वेगवेगळ्या रंगमाध्यमावर हुकूमत, अभ्यासपूर्ण चित्ररचना, यथार्थ दर्शन, समतोल, प्रमाणबद्धता, अशा चित्रकलेच्या मूळ घटक व मूलतत्त्वांवर त्यांनी प्रभुत्व मिळविले. त्यांच्या अभ्यासपूर्ण मानवाकृतींच्या चित्रणात अद्वितीय लय पाहावयास मिळते. त्यांच्या रेखाटनातील रुपरेषा खरोखरच अतुलनीय आहेत. लालित्य हा त्यांच्या रेषेतील गुणधर्म मानला पाहिजे. 
दलालांच्या सृजनाचा बहर म्हणजे एक दृकचमत्कार आहे. त्यांच्या रंगलेपनात सुबोधता आणि जिवंतपणा आहे. ते शोधक वृत्तीचे मानवाकृती निर्माण करणारे चित्रकार होते. अमूर्त चित्रकलेविषयी त्यांना आस्था होतीच. नामांकित चित्रकार लक्ष्मण पै त्यांच्याबद्दल त्यांना आदर होता आणि जवळीकही होती. दलालांची श्रद्धा अकॅडेमिक कलेवर होती. जी त्यांनी पदविका परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासातून अवगत केली होती. त्या वेळच्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आधुनिक चित्रशैलीतून अभिव्यक्त करण्यापासून त्यांना दूर राहावे लागले. याच कारणास्तव त्यांच्या चित्रंचे मूल्यमापनgenre  म्हणून करणे अधिक सयुक्तिक होय. त्यांचा मूळ स्वभाव श्रीमंत, संवेदनशील आणि सृजनशील होता आणि म्हणूनच त्यांच्या कलाकृतीत हे स्वभावगुण प्रकर्षाने जाणवतात. 
त्यांच्या कलाकृतींचे बारकाईने निरीक्षण केल्यास गोव्यातील अतुलनीय सौंदर्यावर त्यांची कला बेतलेली असल्याचे जाणवते. सौंदर्य जाणीवेचा कुंचला शालेय जीवनातच त्यांना गवसला होता. जन्मजात लाभलेल्या कलागुणांना त्यांनी अथक परिश्रमाने विकसित केले. रेषा हे त्यांच्या चित्रंचे बलस्थान. बाकीबाबना वा्मयाभिरुचीबरोबरच चित्रकलेविषयी आस्था असल्यामुळे त्यांच्या अभिव्यक्तीला नवी मिती प्राप्त झाली होती. त्याचप्रमाणो दलालांना चित्रकलेच्या अभिरुचीबरोबरच वा्मयरुचीही होती आणि म्हणूनच त्यांच्या चित्रंत काव्याची प्रचीती येते.  भारतीय लघुचित्रंचा प्रभाव जसा त्यांच्या काही चित्रकृतीत दिसतो, त्याचप्रमाणो समकालीन अभिजात चित्रकारांचा असलेला प्रभावही दिसतो. त्यात बंगाली चित्रकारांचा व त्यांच्या शैलीचा प्रभाव दिसतो. अमृता शेरगील, जेमिनी रॉय यांच्या चित्रंची आठवण करून देणारी काही चित्रे प्रदर्शनात पाहावयास मिळतात. त्यांच्या ज्या चित्रंत व्यावसायिक बंधने नाहीत, तिथे त्यांचा कुंचला वेगळ्या पद्धतीने वापरलेला दिसतो.  
दलालांनी रंगविलेल्या स्त्री प्रतिमेच्या विविध भाववृत्ती प्रभावी झालेल्या आहेत. चित्रंतील स्त्री-पुरुष प्रसंगी मीलनोत्सुक वाटतात; पण ती कामोत्सुक नाहीत. शृंगार रसाची निष्पत्ती अशी चित्रे पाहाताना दिसतात. स्त्री सौंदर्याचे आकर्षण अनादीकाळापासून सृजनशील कलावंताला आहे. प्राचीन काळापासून साहित्य, काव्य, चित्र, शिल्प, नृत्य, नाटय़ अशा सर्वच ललित कलांमधून स्त्री सौंदर्याचा आविष्कार होत आलेला आहे. दलालांच्या चित्रंतही स्त्री सौंदर्याचा विलोभनीय आविष्कार आहे आणि हा आविष्कार निव्वळ भारतीय आहे. ‘ऋजुता’ हा या चित्रंतील स्थायीभाव आहे. 
 
राजा रविवर्मानंतर दलालच..
राजा रविवर्मा या महान चित्रकाराला भारतीय कलाजगतात मोठी लोकप्रियता लाभली. त्यांच्यानंतर त्यांच्याश्ी तुलना होऊ शकेल असे दलालच. राजा रविवर्माच्या चित्रकलेतील विषय हे भारतीय आहेत; परंतु चित्रशैली पाश्चात्य पद्धतीची आहे. दलालांच्या चित्रतील विषय भारतीय आणि चित्रशैलीसुद्धा भारतीयच आहे. 
 
दलालांनी शिवराज्याभिषेकाचं एक भव्य चित्र कॅनव्हासवर तैलरंगात निर्माण केलं. त्याचा आकार 4 बाय 12 फूट. या चित्रची प्रतिकृती या प्रदर्शनात मांडलेली आहे. या चित्रत साकारलेली नाटय़मयता लक्ष वेधून घेते. या चित्रचा दिमाख काही औरच. राज्याभिषेकाच्या प्रसंगी इंग्रज राजदूत नम्रपणो शिवरायांच्या दरबारात प्रवेश करत आहे. त्यापुढे इस्लामी सत्तेचे दूत कुर्निसात करत आहेत. आणि खलिता वाचून दाखवणा:यांच्या पाठमो:या आकृतीमध्ये हे नाटय़ साकारत आहे. सिंहासनावर विराजमान झालेले शिवाजी महाराज व त्यांचे सोबती हे सर्व अनुभवत आहेत, हे दलालांनी अप्रतिम रंगआविष्काराने दाखविले आहे. 
 
सुरवात दिवाळी अंकापासून ..
1945 साली रॉय किणीकर आणि दीनानाथ दलाल या सोबतींनी ‘दीपावली’ या वार्षिक दिवाळी अंकाची सुरुवात केली. चित्रमालिका हे दीपावलीचं वैशिष्टय़च ठरलं. दीपावलीतून त्यांनी केलेल्या रागमाला चित्र, ऋतुसंहार, साहित्यातील नवरस, अष्टनायिका, संस्कृत नाटय़ नायिका, पंचकन्या, लोककलेतील नायक-नायिका, भारतीय नद्या, षडविकार, लावणी नर्तिका, अप्सरा या सारख्या चित्रमालिकांतून चित्ररसिकांची दृष्टी संपन्न झाली. दलालांनी आपल्या सुबक, मोहक आणि देखण्या चित्रकलेच्या माध्यमातून जी श्रीमंती दिली त्याला तोड नाही.
 

Web Title: Illustrations of philanthropy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.