कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचा पोस्टर लाँच
By समीर नाईक | Updated: May 17, 2024 16:01 IST2024-05-17T15:13:41+5:302024-05-17T16:01:05+5:30
कान्स चित्रपट महोत्सवात यंदा भारताचा सहभाग जागतिक चित्रपटसृष्टीत केंद्रबिंदू ठरला.

कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचा पोस्टर लाँच
पणजी: फ्रान्स, कान्स येथे सुरू असलेल्या कान्स चित्रपट महोत्सवात ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ चा (इफ्फी) पोस्टर व ट्रेलर लाँच करण्यात आला. या पोस्टर लाँचवेळी माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू अभिनेता राजपाल यादव, गायक शान, व इफीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यंदा पहिल्यांदाच इफ्फीच्या आयोजनात पाच महिने शिल्लक असताना इफ्फीचा पोस्टर लाँच करण्यात आला. यातून इफ्फिचा जगभरात अधिक प्रचार होण्यास मदत होईल.
कान्स चित्रपट महोत्सवात यंदा भारताचा सहभाग जागतिक चित्रपटसृष्टीत केंद्रबिंदू ठरला. भारततर्फे यंदा 'भारत पर्वचा उत्सव' कान्स चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला. यातून भारताने आपली चित्रपटसृष्टीत काळानुसार केलेला विकास जगभर लोकांपर्यंत पोहचला. सदर कान्स चित्रपट महोत्सवाला १४ मे रोजी सुरुवात झाली आहे, तर २५ मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.
दरवर्षी इफ्फी दि. २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात होत असते. यंदाही या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीला प्रशासन आतापासूनच लागले आहे. बॉलिवूडसोबत जगभरातील सिनेकलाकार इफ्फीत सहभागी होत असतात. कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर आणि ट्रेलर लाँच झाल्याने इफ्फीला अधिक प्रसिद्धी मिळाली आहे.