इफ्फी वेळापत्रकानुसारच
By Admin | Updated: June 22, 2014 02:25 IST2014-06-22T02:17:01+5:302014-06-22T02:25:49+5:30
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन वार्षिक वेळापत्रकानुसारच म्हणजे २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीतच होईल, हे स्पष्ट झाले आहे.

इफ्फी वेळापत्रकानुसारच
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन वार्षिक वेळापत्रकानुसारच म्हणजे २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीतच होईल, हे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, तसेच गोवा मनोरंजन संस्थेने तयारी सुरू केली आहे. यासाठी ई-निविदा जारी केल्या आहेत. याच कालावधीत म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यास सुरू होणारा सेंट फ्रान्सिस झेवियर्स फेस्त व शव प्रदर्शन सोहळा डिसेंबरअखेर चालणार आहे. त्यामुळे इफ्फीचे आयोजन २४ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करावे, अशी
मागणी ख्रिश्चन बांधवांनी केली
होती. ती सरकारने नाकारल्याचे स्पष्ट होते.
राज्यात २00४ पासून सुरू झालेल्या इप्फीच्या तारखा निश्चित असतात. त्यासाठी एक वर्षापासून राज्याला नियोजन करावे लागते. दुसरीकडे झेवियर्स यांचे फेस्त हा गोव्यातील मोठा धार्मिक समारंभ याच कालावधीत आहे. त्यात यंदा झेवियर्स यांचे शव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक येतील, अशी ग्वाही पर्यटन खात्याने दिली आहे. त्यामुळे या काळात वाहतूक तसेच
हॉटेलिंग व्यवसायावर ताण येऊ शकतो.
झेवियर्स संताच्या शव दर्शनाचा लाभ देश-विदेशातील ख्रिश्चन बांधवांसाठी खूप महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे इप्फी सायबाच्या फेस्तापूर्वी म्हणजे २४ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करावा, अशी मागणी ख्रिश्चन बांधवांनी मनोरंजन संस्था, चित्रपट संचालनालयाकडे केली होती. दहा वर्षांपूर्वी म्हणजे २00४ मध्ये सेंट झेवियर्स यांचे शव दर्शनासाठी खुले केले होते. त्या वेळी साधारण अडीच लाख भाविक दर्शनासाठी गोव्यात आले होते. पर्यटन खात्यातर्फे फेस्तानिमित्त विदेशी भाविक गोव्यात यावेत म्हणून प्रयत्नही केले जातात. त्यामुळे भाविकांची संख्या वाढणार, अशी ग्वाही पर्यटन खात्याने यंदाही दिली आहे. फेस्तानिमित्त येणारे पर्यटक आणि इफ्फीचे प्रतिनिधी एकाच कालावधीत गोव्यात दाखल होतील. त्यामुळे गर्दी वाढून वाहतुकीसह सर्व संबंधित घटकांवर ताण वाढू शकतो. (प्रतिनिधी)