इफ्फीचा आज समारोप; ए. आर. रेहमान यांची उपस्थिती
By Admin | Updated: November 30, 2015 02:01 IST2015-11-30T02:00:53+5:302015-11-30T02:01:05+5:30
पणजी : येथे गेले दहा दिवस सुरू असलेल्या ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सोमवारी सांगता होणार

इफ्फीचा आज समारोप; ए. आर. रेहमान यांची उपस्थिती
पणजी : येथे गेले दहा दिवस सुरू असलेल्या ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सोमवारी सांगता होणार आहे. दोनापावल येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात सांयकाळी ४.३0 वाजता समारोप कार्यक्रम सुरू होईल. मुख्य अतिथी म्हणून प्रख्यात संगीतकार ए. आर. रेहमान उपस्थित असतील. या वेळी भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास नृत्याद्वारे मांडला जाणार आहे. समारोपानंतर कला अकादमी व आयनॉक्समध्ये अलेजेंड्रो कारिलो परिनी यांच्या ‘द क्लेन’ चित्रपटाचा खेळ होईल.
अंदाजे सहा हजार प्रतिनिधी गोव्याबाहेरून खास चित्रपट पाहण्यासाठी येथे आले होते. तसेच बॉलीवूड, हॉलीवूड, दक्षिणेतील आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार यांनी रसिकांशी संवाद साधला. बक्षीस वितरण सोहळ्यात सुवर्ण मयूर, रजत मयूर, शांती पुरस्कार, उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री असे अनेक पुरस्कारही जाहीर होणार आहेत. ‘जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक निकिता मिखालकोव्ह यांनी प्रदान केला जाईल. त्यांची पत्नीही या वेळी उपस्थित असेल.
यंदाचे ज्युरी अभिनेते-दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याबरोबर ज्युरी टीम रविवारी गोव्यात उपस्थित होती. तसेच संगीतकार रसुल पुकुट्टी, कला दिग्दर्शक साबू सिरील, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत
पार्सेकर, गोवा मनोरंजन संस्थेचे कार्यकारी अधिकारी अमेय अभ्यंकर, संस्थेचे अध्यक्ष दामू नाईक
आदी मान्यवरही या वेळी उपस्थित राहणार
आहेत. (प्रतिनिधी)