मी कधीच मंत्रिपद मागितलेले नाही; सभापती रमेश तवडकर यांची स्पष्टोक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2024 12:12 IST2024-12-05T12:11:20+5:302024-12-05T12:12:08+5:30
मध्यंतरी तवडकर यांनी आपली नाराजी व्यक्त करीत काही मंत्री योग्यरीत्या काम करत नाहीत, असा आरोप केला होता.

मी कधीच मंत्रिपद मागितलेले नाही; सभापती रमेश तवडकर यांची स्पष्टोक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदाबद्दल मला कोणतेही स्वारस्य नाही, तशी मागणीही मी कधीच केलेली नाही. जे पद माझ्याकडे आहे, त्या पदाला न्याय देण्याचा नेहमीच माझा प्रयत्न आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.
मध्यंतरी तवडकर यांनी आपली नाराजी व्यक्त करीत काही मंत्री योग्यरीत्या काम करत नाहीत, असा आरोप केला होता. पक्ष तसेच सरकारकडून आपल्याला मानसन्मान मिळत नसेल तर सभापतीपद सोडण्याची माझी तयारी आहे, असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या दिल्लीवारीनंतर ते मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग करत असल्याचीही चर्चा होती. परंतु, आता त्यांनी जे विधान केले आहे, त्यावरून त्यांची आता नरमाईची भूमिका दिसून येते.
पत्रकारांनी मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर विचारले असता तवडकर म्हणाले की, मला याबाबतीत स्वारस्य नाही. मी कधीही तशी मागणी केलेली नाही. माझ्याकडे सध्या जे पद आहे, त्या पदाला न्याय देणे, लोकांची सेवा करणे, हे माझे प्राधान्य आहे. मंत्री किंवा मुख्यमंत्री झालो म्हणजे कोणीतरी मोठा झालो, असे मुळीच नाही. अंत्योदय तत्त्वावर काम करून लोकांची सेवा करून त्यांना न्याय देणे, हेच मी महत्त्वाचे समजतो. लोकांना न्याय देऊ शकलो नाही तर मंत्रिपद वगैरे काय कामाचे?