दिल्लीत जाण्याची इच्छा नाही!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उद्‌गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2025 09:41 IST2025-02-22T09:40:50+5:302025-02-22T09:41:47+5:30

गोव्याचा अजूनही बराच विकास करण्याचे काम बाकी

i do not want to go to delhi said cm pramod sawant | दिल्लीत जाण्याची इच्छा नाही!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उद्‌गार

दिल्लीत जाण्याची इच्छा नाही!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उद्‌गार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'दिल्लीत जाण्याची माझी इच्छा नाही. मुख्यमंत्री म्हणून गोव्याचा अजून बराच विकास करण्याचे काम बाकी आहे. माझ्यासाठी गोवाच ठीक असून या लहान राज्याचेच नेतृत्व करायला मला आवडेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही गोव्यात सर्वांत जास्त काळ काम केलेले आहे. प्रशासनाचा अनुभव तुम्हाला आहे. पर्रीकर यांना मोदींनी केंद्रात नेले होते, तसे तुम्हाला नेले तर जाणार काय, या प्रश्नावर सावंत म्हणाले की, गोव्यासारखे लहान राज्यच माझ्यासाठी चांगले. गोव्यात आणखी बरेच काम करावयाचे आहे. दिल्लीत जाण्याची माझी इच्छा नाही.

सावंत म्हणाले की, गोव्याचे पर्यटन केवळ 'सन, सॅण्ड अॅण्ड सी' यापुरतेच मर्यादित नाही तर येथे ऐतिहासिक मंदिरेही असून आध्यात्मिक पर्यटनही चालते. राज्यात ७० टक्के हिंदू आहेत. अयोध्येतील राम जन्मभूमीसारखा इतिहास महालसा मंदिरालाही आहे. पाचशे वर्षे जुने असलेले हे मंदिर पोर्तुगीजांनी पाडले, मात्र सरकारने वेर्णा येथे या मंदिराचे पुनर्निर्माण केले. पोर्तुगीजांनी पाडलेले सप्तकोटेश्वर मंदिराचे शिवाजी महाराजांनी पुनर्निर्माण केले होते. हे मंदिर नव्याने बांधून लोकार्पण करण्याचे भाग्य मुख्यमंत्री म्हणून मला लाभले.

केंद्र सरकारने २०४७ पर्यंत 'विकसित भारत'चे लक्ष्य ठेवले असताना गोवा सरकारने २०३७ पर्यंत 'विकसित गोवा'चा संकल्प सोडलेला आहे. पुढील २५ वर्षांचे नियोजन करून चालू असलेली ८० टक्के पायाभूत विकासाची कामे पूर्ण झालेली आहेत. पर्यटन व उद्योग क्षेत्रात आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे.

महाकुंभला अमृतस्नान करून सकारात्मक ऊर्जा मिळाली. ५० कोटीहून अधिक लोकांनी महाकुंभमध्ये स्नान केले. तो एक अदभूत अनुभव होता. महाकुंभला व्हीआयपी सुविधांची तशी गरज नाही. मी तसा व्हीआयपी कल्चरमध्ये राहात नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्याचे किनारे स्वच्छ व सुरक्षित आहेत. गेल्या दहा वर्षांत राज्य सरकारने झपाट्याने पायाभूत सुविधा निर्माण केल्या. रस्ते व पुलांवर ४० हजार कोटी रुपये खर्च केले. दाबोळी विमानतळाचा विस्तार केला. मोपा येथे नवीन विमानतळ बांधून कार्यरत केला व कनेक्टिव्हिटी वाढवली.

'इन्फ्ल्युएन्सर्स' खोटी माहिती पसरवत आहेत

पर्यटन उद्योग राज्य सरकारच्या घरेलू उत्पन्नात १६.४ टक्के योगदान देतो. गोव्यातील ३५ टक्के लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पर्यटनावर अवलंबून आहेत. असे असताना राज्यात पर्यटकांची संख्या झपाट्याने का घटते आहे? असा प्रश्न केला असता मुख्यमंत्री म्हणाले की, पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही. उलट ती वाढत आहे. काही इन्फ्ल्युएन्सर्स खोटी माहिती पसरवून अपप्रचार करत आहेत. गोव्यातील पर्यटन हिसकावून घेण्यासाठी हा खटाटोप आहे.

'इव्हेंटस' ग्रामीण भागात

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सनबर्न तसेच इतर इव्हेंट किनाऱ्यापासून दूर नेले. त्यामुळे नववर्ष-नाताळात किनाऱ्यावर गर्दी दिसली नाही. याचा अर्थ गोव्यात यंदा पर्यटक आलेच नाहीत किंवा संख्या घटली असा होत नाही. उलट या वर्षी १ कोटी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. गेल्या वर्षी हीच संख्या ८० लाख होती. पर्यटन मोसम बहरलेला असताना जीएसटीमध्ये ९ टक्के वाढ झाली.

पाच मिनिटात पोलिस पोहचतात घटनास्थळी

मुख्यमंत्री म्हणाले की, किनारी भागात १०० क्रमांकांवर घटनेची माहिती मिळताच पाच ते दहा मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहचतात. पूर्वी काही दुर्दैवी घटना घडल्या असतील, परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. पर्यटकांनीही स्थानिकांशी चांगल्या प्रकारे वागले पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस नजर ठेवून असतात. किनाऱ्यांवर जीवरक्षक कार्यरत असून गेल्या पाच वर्षांत ७०० हून अधिक जणांना बुडताना वाचवले आहे.

 

Web Title: i do not want to go to delhi said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.