लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोविंद गावडे विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे. शेणावर काठी मारून मला माझ्यावर ते उसळून घ्यायचे नाही, असे म्हणत कला व संस्कृती, क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी गावडे यांच्या टीकेवर काहीही भाष्य करण्यास नकार दिला.
आमदार गोविंद गावडे यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री तवडकर यांच्यावर अनेक आरोप केले होते. आपल्याला संपवण्यासाठी ज्यांनी सुपारी घेतली, त्यात तवडकर यांचाही सहभाग असल्याचे म्हटले होते. मंत्रिमंडळ बैठकीनंतर तवडकर यांना पत्रकारांनी या आरोपांबद्दल विचारले असता, पुन्हा पुन्हा विषय उकरून काढण्यात मला स्वारस्य नाही. शेणावर काठी मारून मला अंगावर तो चिखल उसळून घ्यायचा नाहीय. माझ्यावतीने मी गोविंद गावडेंचा विषय संपवला होता. परंतु, पुन्हा पुन्हा तो उकरून काढला जात आहे. यापुढे या विषयावर पत्रकार परिषदेतसुद्धा मी काही बोलणार नाही.'
'देवचार' संबोधल्यानंतर वाद विकोपाला
दरम्यान, गावडे-तवडकर यांच्यात संघर्षाची ठिणगी पडल्याने गेले काही दिवस दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालवले होते. तवडकर यांनी गावडे यांना 'देवचार' संबोधल्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला. दोघेही सत्ताधारी भाजप पक्षाचेच आमदार असल्याने भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्तेही गावडे-तवडकर यांच्या वादाकडे गांभीर्याने पाहत आहेत.