लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'मगो पक्षाचा सदस्य म्हणून मी साडेतीन वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे पक्षाचा अध्यक्ष बनण्यासाठी मी पात्र आहे,' असा दावा करीत मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी मगोपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे.
पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास तीन वर्षे सदस्यकाळ पुरेसा आहे. मी ही निवडणूक लढवण्यास पात्र आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'ढवळीकर यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आहेत, त्या काळात बहुजन समाजातील कोणीही जबाबदारी स्वीकारत नव्हते. आता केंद्रीय समितीला अध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यावा लागेल.' ढवळीकर यांच्या म्हणण्यानुसार मगोपच्या घटनेनुसार सहा वर्षे पक्षसदस्यत्वाशिवाय अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येत नाही.
...ते पक्षाच्या हिताचीच चर्चा करतील?
जीत म्हणाले की, 'जर पक्षाच्या केंद्रीय समितीने निर्णय घेतला आणि सुदिन ढवळीकर इच्छित असतील, तर ते अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार आहे. ढवळीकर बंधू दिल्लीला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांना का भेटायला गेले? असे विचारले असता ते म्हणाले की, 'सुदिन आणि दीपक ढवळीकर भाजप नेत्यांकडे पक्षाच्या कल्याणाबद्दल चर्चा करतील.' ढवळीकर बंधूंना दिल्लीला जाताना तुम्हाला का सोबत घेतले नाही? असे विचारले असता जीत म्हणाले की, 'त्यांनी मला सोबत घ्यावे, अशी काही गरज नाही. ज्येष्ठ नेते सुदिन आणि पक्षाध्यक्ष म्हणून दीपक दिल्लीला गेले आहेत.'
मंत्री गोविंद गावडे यांनी मगोप बहुजन समाजाचा पक्ष असल्याने अध्यक्षही बहुजन समाजाचाच हवा. हिंमत असेल तर दीपक ढवळीकर यांनी अध्यक्षपद रिक्त करून बहुजन समाजाच्या नेत्याला द्यावे, असे आव्हान दिले होते. त्यानंतर काही तासांतच जीत यांचे वरील विधान आले आहे.