Hrithik Roshan's divorced wife, Suzan Khan, has fraudulently paid Rs 1.87 crore | हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानने 1.87 कोटींना फसवले
हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानने 1.87 कोटींना फसवले

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 19 - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानवर गोव्यात 1.87 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. स्वत: डिझायनर असलेल्या सुझानने आपण वास्तुविशारद असल्याचे सांगून कंत्राट मिळवल्याचे पणजी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. एम्गी प्रोप्रायटर या खासगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुधित गुप्ता यांनी ही तक्रार दिलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुझान हिला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
कंपनीचे वकील डॉ. अरुण ब्राज डिसा यांनी माध्यमांना अशी माहिती दिली आहे. सुझानने स्वत:ला वास्तुविशारद असल्याचे भासवून कंपनीच्या एका कंत्राटासाठी अर्ज केला आणि ते मिळविलेही. उत्तर गोव्यातील तिसवाडी तालुक्यात शिरदोण येथे कंपनीचा नायरा कॉम्प्रेक्स उभारण्याचे हे कंत्राट होते. त्यासाठी तिला 1.87 कोटी रुपये कंपनीकडून दिले होते. प्रत्यक्षात तिच्याकडून झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे ती व्यावसायिक वास्तुविशारद नसल्याचा कंपनीला संशय आला. कंपनीने तिच्याकडे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरकडून तिला मिळालेला नोंदणी क्रमांक विचारला तेव्हा तिने तो देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कंपनीचा संशय बळावल्यामुळे पोलिसांत तक्रार नोंदविली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीकडून प्रत्यक्षात ही तक्रार खूपपूर्वी दिली होती; परंतु पोलिसांनी एफआयआर नोंदविण्यास विलंब लावला. कंपनीकडून न्यायालयाकडे धाव घेण्याची शक्यता लक्षात घेऊन गुन्हा नोंदविला. 

Web Title: Hrithik Roshan's divorced wife, Suzan Khan, has fraudulently paid Rs 1.87 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.