गोव्यात हॉटेल्स, होम स्टे हाऊसफुल्ल; नाताळ, नववर्षानिमित्त वाढली पर्यटकांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2024 07:58 IST2024-12-23T07:57:18+5:302024-12-23T07:58:03+5:30
सुटीमुळे साहित्य खरेदीसाठी गर्दी

गोव्यात हॉटेल्स, होम स्टे हाऊसफुल्ल; नाताळ, नववर्षानिमित्त वाढली पर्यटकांची संख्या
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यात नववर्ष आणि नाताळची लगबग सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. सर्व पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी दिसत आहे. हॉटेल्स तसेच सर्व वसतिगृहे, होम स्टे हाऊसफुल्ल झाली आहेत. नाताळ तसेच नववर्षाला मोजकेच दिवस शिल्लक असल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे.
राज्यात एरव्ही बाराही महिने पर्यटकांची गर्दी असते. पण नोव्हेबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांत पर्यटकांची संख्या जास्त असते. या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक हे गोव्यात येत असतात. खासकरून विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील सर्व रिसॉर्ट हाऊसफुल्ल होतात. आताही मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने हॉटेल बुक झाली आहेत.
दरम्यान, काल रविवार सुटीचा दिवस असल्याने पणजी बाजारात नाताळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. सुटीचा दिवस असल्याने राज्यातील सर्वच मार्केटमध्ये काल गर्दी पाहायला मिळाली. बुधवारी राज्यभर उत्साहात नाताळ साजरा केला जाणार असल्याने याची जय्यत तयारी सुरू आहे.
नाताळानिमित्त मागील महिन्याभरापासून साहित्य बाजारात दाखल झाले आहे. त्यामुळे हे साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांची लगबग सुरू आहे. शेवटचे दोन दिवस असल्याने काल मोठी गर्दी पाहायला मिळाली. बाजारात घराघरांत लावण्यात येणारे रंगीबेरंगी नक्षत्र, सांताक्लॉजचे कपडे, टोपी, तसेच गवताचे गोठे, ख्रिसमस ट्री असे विविध साहित्य आलेले आहे. त्याचप्रमाणे घरावर सोडण्यात येणारे रंगीबेरंगी प्लास्टिक फुलांचे हार, विद्युत माळा, तसेच मिठाईचे साहित्य खरेदीसाठीही गर्दी होती.
मार्केटमध्ये गर्दी
रविवार सुटी असल्याने पणजी मार्केटमध्ये नाताळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने मार्केटमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे चारचाकी वाहने पार्क करायला जागा नव्हती, तसेच काही ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने वाहने पार्क करायलाही मिळत नव्हती. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास झाला.
खोल्यांची संख्याही वाढली
राज्यात मागील काही वर्षांपासून पर्यटकांची संख्या वाढत असल्याने हॉटेल्स, होम स्टे गेस्ट हाऊसची संख्या वाढली आहे. त्यामुळे खोल्यांची संख्याही वाढत आहे. राज्यातील ७० हजारांच्या आसपास खोल्या आहेत तर बेड्सची संख्या एक लाखावर आहे. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची योग्य सोय व्हावी यासाठी संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी व्यावसायिक, अन्य दुकानदारांच्या व्यवसायात वाढ झाली आहे.
किनाऱ्यांना पसंती
राज्य सरकारने अंतर्गत पर्यटनवाढीसाठी कितीही प्रचार केला तरी नाताळ सुटी, नववर्षानिमित्त गोव्यात येणारे बहुतांश पर्यटक समुद्रकिनारी राहण्यास पसंती देतात. किनाऱ्यांवर पर्यटकांना मनोरंजनाची सोय केली जाते. नववर्ष किनाऱ्यांवर मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. त्यामुळे अंतर्गत पर्यटनस्थळांना याचा जास्त लाभ होत नाही. जी हॉटेल्स समुद्रकिनारी आहेत, त्यांना जास्त फायदा मिळतो. उत्तर व दक्षिण गोव्यातील कळंगुट, बागा, वागातोर, कोलवा अशा काही प्रसिद्ध किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी असते.
चर्च तसेच घरावरही सजावट
नाताळानिमित्त ख्रिस्त बांधवांनी आपली घरे सजवली असून, घरावर विद्युत मळा सोडल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्व चर्च चॅपलमध्ये आकर्षक आशीर्वाद विद्युत रोषणाई केली आहे. त्याचप्रमाणे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम सध्या सुरू झाले आहेत. हे मनोरंजनाचे कार्यक्रम नवीन वर्षापर्यंत असणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक आस्थापनामध्ये नाताळाच्या सुविधा सध्या उपलब्ध केल्या आहेत. नाताळानिमित्त अनेक दुकाने खास ऑफर ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कपडे खरेदीवर मोठ्या प्रमाणात सवलती ठेवल्या आहेत.