हॉट एअर बलुन्स एप्रिलमध्ये
By Admin | Updated: January 7, 2015 01:27 IST2015-01-07T01:24:36+5:302015-01-07T01:27:27+5:30
पणजी : येत्या एप्रिलमध्ये राज्यात हॉट एअर बलुन्स व अॅम्फीबियस व्हेईकल्स (पाण्यावर व जमिनीवर चालणारी वाहने) हे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.

हॉट एअर बलुन्स एप्रिलमध्ये
पणजी : येत्या एप्रिलमध्ये राज्यात हॉट एअर बलुन्स व अॅम्फीबियस व्हेईकल्स (पाण्यावर व जमिनीवर चालणारी वाहने) हे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. पर्यटन खाते व गोवा पर्यटन विकास महामंडळाने तसा निर्णय घेतला असून या कामासाठी दोन कंपन्यांचीही निवड केली आहे.
दिल्ली येथील कॅम्पलिंग रिट्रिट्स प्रा. लिमिटेड कंपनीकडून हॉट एअर बलुन्स, तर गोव्यातील डिसोझा लिशर प्रा. लिमिटेड कंपनीकडून अॅम्फीबियस व्हेईकल्स प्रकल्प चालविला जाणार आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा अधिक थरारक; पण आनंददायी असा अनुभव यावा म्हणून हे दोन प्रकल्प सुरू करण्याचे ठरले आहे. गोव्यातील फेरीबोट धक्क्यांवरून सहा अॅम्फीबियस वाहने सोडली जातील. जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी ही वाहने चालू शकतील. गोव्यातील जलमार्गांवर ‘हॉप आॅन हॉप आॅफ’ सफरींचे आयोजन केले जाणार आहे. अर्धा तास ते एक तास सफरीवेळी ३४ प्रवाशांना वाहनात स्थान दिले जाईल. पाण्यावर व रस्त्यावरही चालू शकतील, अशी वाहने गोव्यातील एसीजीएलच्या सहकार्याने तयार केली जाणार आहेत. गोव्यात यामुळे इको-टुरिझमही वाढीस लागेल.
हॉट एअर बलुन्स प्रकल्प दूधसागर परिसरात राबविला जाईल. या प्रकल्पांतर्गत प्रारंभी दोन बलुन्स वापरले जातील. या दोन्ही प्रकल्पांमध्ये गोवा पर्यटन विकास महामंडळ गुंतवणूक करणार नाही. महामंडळाला वार्षिक सुमारे ६0 लाख रुपयांचा महसूल मिळेल, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांनी म्हटले आहे.
(खास प्रतिनिधी)