राज्यात मिळणार हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2025 07:54 IST2025-02-27T07:53:46+5:302025-02-27T07:54:39+5:30
ताज ग्रुपसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

राज्यात मिळणार हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : देशातील सर्वांत मोठे हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण केंद्र हे पाटो पणजी येथे उभारले जाणार आहे. त्यात दरवर्षी ११०० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. गोव्याच्या पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (ताज ग्रुप), कौशल्य विकास संचालनालय, गोवा यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली.
या सहकार्यामुळे गोव्यात भारतातील सर्वात मोठे हॉस्पिटॅलिटी स्किलिंग सेंटर उभे राहणार आहे. शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालक एस. एस. गावकर आणि आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पुनीत छटवाल यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षणाची त्रिसूत्री
पुनकौशल्य आणि कौशल्यवृद्धी या केंद्रातील प्रशिक्षणाची त्रिसूत्री असेल. आयएचसीएलतर्फे गोव्यातील तरुण,
तरुणींना कौशल्यकुशल बनविले जाणार आहे. तसेच त्यांच्या करिअरच्या संधी वाढवण्यात आणि राज्याच्या आर्थिक विकासात योगदान देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी या प्रकल्पाचे योगदान लाभेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कौशल्य केंद्र उद्योगाच्या मागण्या पूर्ण करणारे हे केंद्र असेल. दर्जाच्या बाबतीत जागतिक स्तराचे हे प्रशिक्षण असेल. दरवर्षी १११० जणांना प्रशिक्षित केले जाईल. त्यामुळे युवक व युवतींना रोजगाराची हमी निश्चितच मिळणार आहे. - पुनित छटवाल, ताज ग्रुपचे सीईओ