हेलिकॉप्टर बांधणी उद्योग गोव्यात शक्य : पर्रीकर
By Admin | Updated: February 7, 2015 01:54 IST2015-02-07T01:47:47+5:302015-02-07T01:54:06+5:30
पणजी : गोव्यात हेलिकॉप्टर बांधणी उद्योग सुरू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे,

हेलिकॉप्टर बांधणी उद्योग गोव्यात शक्य : पर्रीकर
पणजी : गोव्यात हेलिकॉप्टर बांधणी उद्योग सुरू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी सांगितले. दोनापावल येथे भारतीय उद्योग महासंघाकडून आयोजित गोवा सरकारच्या गुंतवणूक धोरणासंबंधीच्या चर्चासत्रावेळी पर्रीकर बोलत होते.
हेलिकॉप्टर बांधणीचा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक अशा सर्व साधनसुविधा गोव्यात आहेत. आम्ही अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. संरक्षण क्षेत्रातील प्रकल्पांसाठी नेहमीच योग्य असे कायदे असायला हवेत. शेवटी देशाचे संरक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शत्रू काही आपल्या देशातील कायद्यांकडे पाहणार नाही. संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांशीसंबंधित सुधारणा काही महिन्यांत घडून येतील, असे ते म्हणाले.
मार्च २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर आमच्या हाती गोव्याची सूत्रे आली, तेव्हा गोव्याच्या उद्योग विश्वातील वातावरण हे नकारात्मक होते; कारण उद्योजकांना वेगवेगळ््या अधिकारीणींकडे धावावे लागत होते. आम्ही गोवा राज्य गुंतवणूक मंडळ स्थापन केले व त्यानंतर स्थिती बदलू लागली. संरक्षण उत्पादन क्षेत्रातही पूर्वी नकारात्मक स्थिती होती. आपण नकारात्मक गोष्टी व अडचणी काढून टाकण्यास प्राधान्य दिले आहे. येत्या काही महिन्यांत त्याबाबत यश येईल, असे पर्रीकर यांनी नमूद केले. (खास प्रतिनिधी)