गुरू-शिष्य हे पवित्र नाते: मंत्री सुभाष शिरोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2025 12:45 IST2025-02-01T12:45:40+5:302025-02-01T12:45:57+5:30
स्व. देवारी यांच्या स्मरणार्थ पहिला स्वर संवादिनी पुरस्कार डॉ. प्रदीप बोरकर यांना सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

गुरू-शिष्य हे पवित्र नाते: मंत्री सुभाष शिरोडकर
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : गुरू व शिष्य हे नाते पवित्र नाते आहे. माणूस आयुष्यात कितीही भरकटला किंवा उच्च पदावर पोचला तरी तो आपल्या आवडत्या गुरूला कधीच विसरत नाही. त्यांचे नाते व आठवण चिरंतर मनात राहते. स्व. शशिकांत देवारी यांनी अनेक कलाकार घडवले, त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या नाट्यमहोत्सवातून दिलेली श्रद्धांजली अप्रतिम आहे. गुरूमुळे शिष्य घडतो व मोठा होतो. गुरू-शिष्य नाते हे अंतिम सत्य आहे, असे उद्गार सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले.
कला व सांस्कृतिक संचालनालयाच्या सहकार्याने श्री नवदुर्गा संस्थान व सम्राट क्लब बोरीतर्फे आयोजित पहिल्या स्व. शशिकांत ऊर्फ विनायक रामचंद्र देवारी स्मरणार्थ नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन मंत्री शिरोडकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खास निमंत्रित दीपक नार्वेकर, श्री नवदुर्गा संस्थान अध्यक्ष शाम प्रभुदेसाई, स्वागताध्यक्ष सुंदर प्रभुदेसाई, सम्राट क्लब बोरी अध्यक्ष संतोष नाईक, कार्यक्रम अधिकारी मिलिंद देवारी उपस्थित होते.
खास निमंत्रित दीपक नार्वेकर म्हणाले की, आयोजक व पुरस्कृत दात्यांच्या सहकार्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना मिळते. सांस्कृतिक संवर्धन चळवळीत सम्राट क्लब बोरीच्या योगदानाबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
कलाकारांचा सन्मान
यावेळी स्व. देवारी यांच्या स्मरणार्थ पहिला स्वर संवादिनी पुरस्कार डॉ. प्रदीप बोरकर यांना सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला तर नाट्यकलाकार दिलीप च्यारी व गोपाळ ऊर्फ बाबल दुर्गाराम भट बोरकर यांचा सत्कार करण्यात आला.
महिलांनी सादर केला नाट्यप्रयोग
सत्काराला उत्तर देताना प्रदीप बोरकर यांनी स्व. देवारी यांच्याबरोबरच्या बालपणीच्या व नंतर नाटकातील आठवणी सांगून स्वरसंवादिनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नंतर लाडेवाडा मडकई येथील विमलानंद प्रस्तुत व दिग्दर्शक संदीप फडते यांचे पौराणिक संगीत नाटक गुरुदक्षिणा सादर करण्यात आले. संपूर्ण नाटक युवती व महिलांनी सादर केले. यावेळी निर्माता आणि दिग्दर्शक संदीप फडते यांचा खास गौरव झाला.