लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : देशाला स्वराज्य मिळाले त्याचे आपल्याला सुराज्य करायचे आहे. राज्य सरकारही त्याच मार्गाने जात असून मंत्रिमंडळातील सर्व आमदार, मंत्र्यांनी त्यासाठी एकजूट होऊन काम करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्वांनी एकजुट आणि एकमताने काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवोली येथे केले.
शिवोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बावीस फुट उंच अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, सांताक्रुजचे आमदार रुदोल्फ फर्नांडिस, समर्थन संघटनेचे संस्थापक नीलेश वेर्णेकर, समर्थनचे अध्यक्ष प्रेमानंद आरोलकर, उपाध्यक्ष नितीन आगरवाडेकर, सचिव यदुवीर सीमेपुरुषकर, दीपक आगरवाडेकर, विजय कोरगावकर, शिवोली जिल्हा पंचायत सदस्या सनिशा तोरसकर, सरपंच संदेश हडफडकर, पंच अमित मोरजकर, मनोरमा गोवेकर, शोभावती चोडणकर, शर्मिला वेर्णेकर उपस्थित होत्या.
यावेळी मूर्तीकार शैलेश खेडेकर यांचा मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समर्थन संघटनेचे दिवंगत कार्यकतें मुरारी जीवाजी, विनोद वेर्णेकर यांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला. यावेळी स्थानिक महिलांचे ढोलताशा वादन तसेच कोल्हापूर येथील तलवारबाजांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.