सरकारकडून कामगारांची हेळसांड!
By Admin | Updated: July 26, 2016 02:36 IST2016-07-26T02:36:38+5:302016-07-26T02:36:38+5:30
पणजी : राज्यातील विविध अशा आठ कामगार संघटनांनी एकत्रित येऊन सोमवारी आझाद मैदानावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले.

सरकारकडून कामगारांची हेळसांड!
पणजी : राज्यातील विविध अशा आठ कामगार संघटनांनी एकत्रित येऊन सोमवारी आझाद मैदानावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. तसेच गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे भाजप सरकार दुर्लक्ष करत असल्याने सरकारचा निषेध केला. शेकडो कामगारांनी एकत्रित येऊन आंदोलनात भाग घेतला. तसेच सरकारच्या किमान वेतन अधिसूचनेविरोधात गोवा आयटक, सरकारी कर्मचारी संघटना अशा पाच ते सहा संघटनांनी एकत्रित येऊन पाटो श्रमशक्ती भवनाजवळ निदर्शने केली.
आझाद मैदान येथे एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केलेल्या संघटनांत क्रीडा खात्याचे कामावरून कमी करण्यात आलेले कंत्राटी कामगार, वेस्टर्न इंडिया शिपयार्ड लिमिटेड कामगार संघटना, अखिल गोवा पॅरा शिक्षक संघटना, १0८ रुग्णवाहिका कामगार संघटना, अखिल गोवा खनिज ट्रक ड्रायव्हर संघटना, डबल पार्ट टाईम शिक्षक संघटना, बालरथ कामगार संघटना आणि एका खासगी कंपनीच्या कामगार संघटनेचा समावेश होता.
वेर्स्टन इंडिया लिमिटेड कामगारांचे दि. २0 पासून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला संघटनेचे तेरा कामगार दररोज उपोषणाला बसत होते. सरकार जोपर्यंत आमच्या मागण्यांवर लक्ष देत नाही, तोपर्यंत आम्ही लढा देत राहू, असे कामगारांचे म्हणणे आहे. संघटनेचे दोन कामगार विष्णू नाईक व अलेक्झांडर पाशेको हे आमरण उपोषणाला बसले आहेत.
कामगारांच्या मागण्यांवर विधानसभा सुरू असताना कोणतेही निर्णय घेण्यात आले नाहीत तर जनआंदोलन उभारू आणि भाजपविरोधात जाण्याचा इशारा ट्रेड युनियन संघटनेचे अध्यक्ष अॅड. अजितसिंग राणे यांनी यावेळी दिला.
श्रमशक्ती भवनासमोर निदर्शने
दरम्यान, किमान वेतनाबाबत सरकारने हल्लीच अधिसूचित केलेली अधिसूचना कामगारांना अमान्य असल्याने ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी करत आयटकच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकारी कर्मचारी संघटनेपासून बँक खाते कर्मचारी संघटनेचे कामगार एकत्रित आले. श्रमशक्ती भवन येथे आयटकचे ख्रिस्तोफर फॉन्सेको, जॉन नाझारेथ, पुती गावकर, अॅड. सुहास नाईक इत्यादी कामगार संघटनेचे पुढारी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)