कॅसिनोवरून सरकार लक्ष्य
By Admin | Updated: April 3, 2016 15:52 IST2016-04-03T15:52:12+5:302016-04-03T15:52:12+5:30
मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोप्रश्नी सरकारला सध्या सर्वच थरांमधून टीकेस सामोरे जावे लागत आहे.

कॅसिनोवरून सरकार लक्ष्य
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ३ - मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोप्रश्नी सरकारला सध्या सर्वच थरांमधून टीकेस सामोरे जावे लागत आहे. अपक्ष आमदार रोहन खंवटे व नरेश सावळ यांनी शनिवारी जोरदार हल्ला चढवत सरकार कॅसिनो लॉबीचे एजंट बनल्याचा आरोप केला.
खंवटे व सावळ यांनी शनिवारी येथे संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. खंवटे म्हणाले की, कॅसिनोप्रश्नी सरकारने घेतलेला निर्णय ही गोमंतकीय जनतेची फार मोठी फसवणूक आहे. कॅसिनोंना पर्यायी जागा शोधतोय, असे सरकार सांगून गोमंतकीयांशी गेम खेळत आहे. कॅसिनोंसाठी पर्यायी जागा शोधणे ही कॅसिनो मालकांची जबाबदारी आहे; पण सरकार कॅसिनोंचे एजंट बनल्यामुळे सरकारच जागा शोधत असल्याचे सांगते. एखाद्या उद्योजकाचा डिचोलीतील उद्योग जर आजारी झाला व तो चालेनासा झाला, तर त्या उद्योगाला दुसर्या शहरात जागा कधी सरकार शोधून देते का, ते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अगोदर सांगावे.
खंवटे म्हणाले की, कॅसिनोंसाठी गेमिंग आयोग नेमण्याचे आश्वासन चार वर्षांपूर्वी सरकारने दिले होते; पण सरकार आता या आयोगाच्या नियुक्तीबाबत काहीच बोलत नाही. मांडवीतील कॅसिनोंना आपण जमिनीवर जागा देऊ, अशी भाषा सरकार करते. आम्ही या प्रकारास पूर्णपणे विरोध करू. जमिनींवर म्हणजे हॉटेलमध्ये अगोदरच कॅसिनो खूप चालत आहेत. त्यात आणखी भर नको. मांडवीतील कॅसिनोंना सरकारने खोल समुद्रातच पाठवावे. आणखी यू-टर्न घेऊ नयेत. सध्या निवडणुकीचे वर्ष असल्याने विविध प्रकारे निवडणूक निधी उभा करण्याचेच काम सरकार करत आहे.
गोविपा'ने काढला पाठिंबा
मडगाव : गेल्या चार वर्षांत भाजप सरकारने आपली पाच टक्के आश्वासनेही पूर्ण केलेली नाहीत, अशी खरमरीत टीका सत्ताधारी भाजप पक्षाचा सहकारी पक्ष असलेल्या गोवा विकास पार्टीचे सर्वेसर्वा मिकी पाशेको यांनी केली आहे. या सरकारला आपण पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपची लोकविरोधी धोरणे पाहून मी हा पाठिंबा काढून घेतला आहे, असे ते म्हणाले. गेल्या चार वर्षांत या सरकारने फक्त 'यू टर्न' घेतले आहेत. मांडवीतून कॅसिनो हलवण्याबाबतही या सरकारने तेच केले आहे. कारण कॅसिनो उद्योगाकडून भाजपला निवडणुकीचा निधी मिळत असल्यामुळे ते या उद्योगाला हात लावू शकत नाहीत, असे ते म्हणाले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यातील ८५ टक्के आश्वासने पूर्ण केली आहेत, असा दावा केला असला, तरी त्यात तथ्य नाही. या सरकारने ५ टक्केही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे आपला गोविपा पक्ष भाजपपासून दोन हात दूर राहणे पसंत करेल, असे ते म्हणाले.