सरकारने क्लॉडचे आभार मानावेत
By Admin | Updated: December 10, 2015 01:54 IST2015-12-10T01:54:12+5:302015-12-10T01:54:23+5:30
पणजी : सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराविरुद्ध न्यायालयात जाणाऱ्या पर्यावरणप्रेमींनाही सरकार आता टार्गेट करू लागले आहे, हे

सरकारने क्लॉडचे आभार मानावेत
पणजी : सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराविरुद्ध न्यायालयात जाणाऱ्या पर्यावरणप्रेमींनाही सरकार आता टार्गेट करू लागले आहे, हे धक्कादायक आहे. डॉ. क्लॉड आल्वारीस यांनी यापूर्वी न्यायालयात धाव घेतल्यामुळेच १५ दशलक्ष टन खनिज मालाची मालकी सरकारजवळ आली आणि सरकारला आतापर्यंत ७५० कोटींचा महसूलही प्राप्त झाला. याबाबत खरे म्हणजे गोवा सरकारने आल्वारीस यांचे आभार मानायला हवेत, असा सल्ला काँग्रेसचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी दिला आहे.
मडकईकर म्हणाले की, आल्वारीस यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले जोडप्रतिज्ञापत्र हे अनेक गोष्टी स्पष्ट करते. आल्वारीस यांच्यामुळे गोव्याच्या खाणी बंद पडल्या नाहीत; कारण आल्वारीस हे न्यायालयात जाण्यापूर्वी गोवा विधानसभेत ज्यांनी गोव्यात सगळे खाण घोटाळेच सुरू आहेत असे सातत्याने आरोप केले, त्या आरोपांमुळे गोव्याच्या खाण क्षेत्राबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गोवा म्हणजे बेकायदा खाण व्यवसायच, असे समीकरण २०१२ च्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन विरोधकांनी केले होते. तीच संधी पर्यावरणप्रेमींनी साधली व आल्वारीस यांच्यासारखे अभ्यासक मग न्यायालयात गेले. गोव्यात कायदेशीर खाण व्यवसाय सुरू राहायला हवा. मात्र, खाण क्षेत्रातील बेबंदशाही व सत्ताधाऱ्यांचा गैरकारभार याविरुद्ध न्यायालयात गेलेले याचिकादार आल्वारीस यांना सरकारने लक्ष्य बनविणे ही समाजातील सर्वच जागृत घटकांसाठी अत्यंत धोक्याची गोष्ट आहे. (प्रतिनिधी)