सरकारी खरेदीवर ३ महिने बंदी
By Admin | Updated: January 16, 2016 01:55 IST2016-01-16T01:51:04+5:302016-01-16T01:55:46+5:30
पणजी : आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारी खात्यांनी वायफळ खर्च करू नये म्हणून अर्थ खात्याने खर्च कपातीसाठी नव्या सूचना असलेले

सरकारी खरेदीवर ३ महिने बंदी
पणजी : आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारी खात्यांनी वायफळ खर्च करू नये म्हणून अर्थ खात्याने खर्च कपातीसाठी नव्या सूचना असलेले निवेदन शुक्रवारी जारी केले. येत्या दि. ३१ मार्चपर्यंत तीन महिने कार्यालयासाठी कारगाड्या, अन्य वाहने, संगणक, वातानुकूलन यंत्रे, फॅक्स, झेरॉक्स यंत्र, कपाटांसह विविध प्रकारचे फर्निचर सरकारी खात्यांनी खरेदी करू नये, असे अर्थ खात्याने बजावले आहे. शिवाय विदेश दौऱ्यांवर व अभ्यास दौऱ्यांवर निर्बंध लागू केले आहेत.
अर्थसंकल्पीय तरतुदीनंतर सर्व सरकारी खात्यांना निधी दिलेला असतो. अगोदर हा निधी खाती खर्च करत नाहीत. काही वेळा अर्थ खात्याकडूनच मंजुरी न मिळाल्यामुळेही खात्यांना खर्च करण्यात अडचणी येतात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. इलेक्ट्रिकल साहित्यासह कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात फर्निचर खरेदी केले जाते. हे सगळे पुढील तीन महिने बंद ठेवावे, असे अर्थ खात्याने म्हटले आहे. लेखा खात्याच्या संचालकांनी खरेदीसाठीची बिले मंजूर करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रत्येक खात्याचा खर्च ८.३ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहावा, असेही अर्थ खात्याने निवेदनात म्हटले आहे. (खास प्रतिनिधी)