विद्यापीठ निवडणुकीत सरकारचा हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 02:11 IST2016-08-26T02:08:53+5:302016-08-26T02:11:04+5:30

पणजी : गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या कार्र्यकारी समितीसाठी शुक्रवारी (दि. २६) निवडणुका होत आहेत. तथापि, या निवडणुका

Government interference in university elections | विद्यापीठ निवडणुकीत सरकारचा हस्तक्षेप

विद्यापीठ निवडणुकीत सरकारचा हस्तक्षेप

पणजी : गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या कार्र्यकारी समितीसाठी शुक्रवारी (दि. २६) निवडणुका होत आहेत. तथापि, या निवडणुका भाजयुमो गटास जिंकता याव्यात म्हणून सरकार निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहे व विद्यापीठावरही दबाव आणत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी गुरुवारी येथे केला.
विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे आणि एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष टेराज मुल्ला यांच्या उपस्थितीत फालेरो यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. आम्ही विद्यापीठात कधी हस्तक्षेप करत नाही. विद्यापीठ म्हणजे ज्ञानाचे मंदिर आहे. विद्यापीठ व शिक्षण क्षेत्र राजकारणापासून दूर ठेवायला हवे. तथापि, सरकारने सध्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून जे काही चालवले आहे ते अत्यंत आक्षेपार्ह व अन्यायकारक आहे, असे फालेरो म्हणाले. एनएसयूआयची प्रतिनिधी प्रचीती गुरव हिने सादर केलेला उमेदवारी अर्ज ऐनवेळी योग्य कारण न देता फेटाळण्यात आला आहे. वास्तविक उमेदवारी अर्जासोबत तिने सगळी आवश्यक कागदपत्रे सादर केल्याची पावती अगोदर तिला देण्यात आली होती. हा अन्याय विद्यापीठाने दूर केला नाही तर निवडणूक प्रक्रियेशी खेळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी आम्ही करू, असे फालेरो यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी कुलपती या नात्याने राज्यपालांनी हस्तक्षेप करून नि:पक्षपाती चौकशी करून घ्यावी, अशीही मागणी फालेरो यांनी केली. गोवा विद्यापीठात लोकशाहीचा खून सुरू आहे. दिल्लीतील नेहरू विद्यापीठातही भाजप सरकारने हेच काम केले होते, असे फालेरो म्हणाले.
राणे यांनीही या वेळी विद्यापीठाच्या निवडणुका या चांगल्या वातावरणात व्हायला हव्यात, असे मत मांडले. अशा प्रकारे कुणावर अन्याय होऊ नये याची काळजी नवे कुलगुरू साहनी यांनी घ्यावी, असे ते म्हणाले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Government interference in university elections