गोव्यात ६00 कोटींची बिले थकल्याने सरकारी कंत्राटदार एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2016 21:48 IST2016-10-04T21:48:31+5:302016-10-04T21:48:31+5:30
गोव्यात ६00 कोटींहून अधिक रकमेची बिले थकल्याने सरकारी कंत्राटदार एकत्र आले असून मंच स्थापन करुन शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेतली.

गोव्यात ६00 कोटींची बिले थकल्याने सरकारी कंत्राटदार एकवटले
- ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.04 - गोव्यात ६00 कोटींहून अधिक रकमेची बिले थकल्याने सरकारी कंत्राटदार एकत्र आले असून मंच स्थापन करुन शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेतली. गेल्या वर्षभरापासून पडून असलेली ही बिले पुढील २0 दिवसात दिवाळीआधी तरी फेडण्यात यावीत, अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे.
गोवा सरकारी कंत्राटदार मंचचे अध्यक्ष संग्राम केरकर, निमंत्रक जितेश कामत, अनंत नाईक, मिलिंद गांवस, अमोल नावेलकर, उमेश गडेकर, राजेश हळदणकर, संदेश पोतनीस, अभिजित देसाई यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. साबांखा पूल, रस्ते तसेच इतर बांधकामे करुन घेते परंतु बिले मात्र वेळेवर फेडत नाही, असा आरोप आहे.
इ धनादेशाची वैधता ३0 दिवसांवरुन ९0 दिवस करावी. बिलांच्या पेमेंटच्या बाबतीत पोर्टलवर यादी टाकून पारदर्शकता आणावी, कालबध्दरित्या बिले फेडली जावीत आदी अन्य मागण्या आहेत. सध्याची बिले फेडण्याची पध्दत सदोष असून ती सुधारावी, अशी मागणी आहे.
मोठ्या प्रमाणात बिले थकलेली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. तसे झाल्यास बिले आणखी रखडतील. दिवाळीआधी बिलांची रक्कम न मिळाल्यास पुढचे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा देताना प्रसंगी न्यायालयातही जाण्याची तयारी कंत्राटदारांनी ठेवली आहे.