गोव्यातील टुरिस्ट टॅक्सींचा संप अखेर मागे, उपसभापती मायकल लोबोंचे आंदोलकांना लेखी आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 05:27 PM2018-01-21T17:27:33+5:302018-01-21T17:28:00+5:30

राज्यात टुरिस्ट टॅक्सीमालकांनी स्पीड गव्हर्नर आणि डिजिटल मीटरला विरोध करीत पुकारलेला संप अखेर आज सायंकाळी सत्ताधारी आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांच्या लेखी आश्वासनानंतर मिटला

Goverment of tourist taxis in Goa is finally behind, written assurance to deputy speaker Michael Lobo | गोव्यातील टुरिस्ट टॅक्सींचा संप अखेर मागे, उपसभापती मायकल लोबोंचे आंदोलकांना लेखी आश्वासन

गोव्यातील टुरिस्ट टॅक्सींचा संप अखेर मागे, उपसभापती मायकल लोबोंचे आंदोलकांना लेखी आश्वासन

Next

पणजी : राज्यात टुरिस्ट टॅक्सीमालकांनी स्पीड गव्हर्नर आणि डिजिटल मीटरला विरोध करीत पुकारलेला संप अखेर आज सायंकाळी सत्ताधारी आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांच्या लेखी आश्वासनानंतर मिटला आणि टॅक्सीसेवा सुरू करण्यात आली. स्पीड गव्हर्नरची सक्ती काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सरकारतर्फे हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचे तसेच वाहनांना फिटनेस दाखले देण्याची लेखी हमी आंदोलकांनी घेतली. लोबो यांच्या नेतृत्वाखाली 21 आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली तेव्हा पर्रीकर यांनी तोंडी आश्वासन दिले होते.

लोबो यांनी सर्व मागण्या मान्य केल्या जातील, असे लेखी लिहून द्यावे, असा हट्ट येथील आझाद मैदानावर जमलेल्या आंदोलकांनी धरला. शेवटी लोबो यानी लेखी हमी दिली तेव्हाच आंदोलक शांत झाले. गोव्यात गेले तीन दिवस टुरिस्ट टॅक्सीमालकांचा संप सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांबरोबरच स्थानिकांचीही मोठी परवड झाली होती. रविवारी सलग तिस-या दिवशीही संप चालूच ठेवून टॅक्सीसेवा बंद ठेवण्यात आली होती. हे आंदोलन चिघळण्याची शक्यता होती

त्यामुळे टॅक्सीमालकांच्या प्रश्नावर सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक, आमदार टोनी फर्नांडिस, आमदार नीळकंठ हळर्णकर यांनीही टॅक्सीवाल्यांच्या श्ष्टिमंडळासह पर्रीकरांची भेट घेतली होती. शांताराम यांनी त्यानंतर आझाद मैदानात येऊन संबोधलेही होते. नंतर मायकल लोबो २१ जणांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटले.
लोबो आझाद मैदानावर आले तेव्हा आंदोलकांनी एकच गलका केला. मुख्यमंत्र्यांनी तोंडी दिलेले आश्वासन आम्हाला मान्य नाही, तुम्ही लेखी द्या तरच संप मागे घेऊ, असा हेका आंदोलकांनी धरला. सुमारे दोन हजारांचा जमाव यावेळी होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आंदोलकांचे नेते तथा टॅक्सीमालक संघटनेचे पदाधिकारी बाप्पा कोरगावकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर आमचा विश्वास नाही म्हणून लोबो यांच्याकडून लेखी घ्यावे लागले. २४ फेब्रुवारीपर्यंत स्पीड गव्हर्नरचा प्रश्न निकालात न काढल्यास पुन: आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले की, स्पीड गव्हर्नर नसलेल्या टॅक्सींना फिटनेस दाखला देण्याचे बंद केले आहे. ते पूर्ववत् चालू करण्याचे तसेच सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची हमी सरकारने दिली आहे त्यानुसार तूर्त संप मागे घेत आहोत. परंतु या मागण्या मान्य न झाल्यास पुन: रस्त्यावर उतरावे लागेल.

आमदार निलेश काब्राल यांनी ओला किंवा उबेर या परप्रांतीय टॅक्सी सेवा गोव्यात आणून दाखवाव्याच, असे आव्हान देताना या टॅक्सी आणल्यास त्या चालू देणार नाही, असा इशाराही कोरगांवकर यांनी दिला. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांचाही त्यांनी समाचार घेतला. किती टॅक्सीवाल्यांना सरकारने सुविधा दिल्या आणि किती टॅक्सीवाल्यांचा विमा भरला हे ढवळीकर यांनी दाखवून द्यावे, असे जाहीर आव्हान त्यांनी दिले.

Web Title: Goverment of tourist taxis in Goa is finally behind, written assurance to deputy speaker Michael Lobo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा