गोमेकॉचे सुरक्षा रक्षक संपावर
By Admin | Updated: March 18, 2015 01:04 IST2015-03-18T01:04:15+5:302015-03-18T01:04:40+5:30
पणजी : मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त केलेले ३५० कर्मचारी

गोमेकॉचे सुरक्षा रक्षक संपावर
पणजी : मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त केलेले ३५० कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. नोकरीवर नियुक्त करताना देण्यात आलेली आश्वासने पाळण्यात आली नाहीत म्हणून संपावर गेलो असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मनुष्यबळ विकास संसाधन मंडळाने नियुक्त केलेल्या ३५० सुरक्षा रक्षकांना ११ हजार २८७ रुपये एकूण वेतन देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तसेच ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांना राहाण्याची व इतर सुविधा पुरविण्यात येतील, असेही सांगण्यात आले होते. पीएफ, ईएसआय इत्यादी कापून कर्मचाऱ्यांना ९ हजार ५०० रुपये देणे बंधनकारक होते. मात्र, केवळ साडेआठ हजारच पगार देण्यात येत असून एकूण पगारातून कापला जाणारा पगारही देण्यात यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
सुरक्षा रक्षकांनी मंगळवारी मनुष्यबळ विकास संसाधन मंडळात सरव्यवस्थापकांची भेट घेऊन वेतनाबाबतचा जाब विचारला. या वेळी सरव्यवस्थापकांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. मंडळातर्फे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बेकायदेशीर कापणी करण्यात येत असून हे बंद होणे आवश्यक आहे. तसेच कापण्यात आलेले वेतन परत करावे, अशी मागणीही सुरक्षा रक्षकांनी केली आहे.
मनुष्यबळ मंडळाने केलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी कामगार नेते अजितसिंग राणे यांची भेट घेतली आहे. राणे यांनी कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले असून मंडळाविरुद्ध तक्रार करण्यात येईल, तसेच सुरक्षा रक्षकांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे राणे यांनी सांगितले.