क्लब, पब, मसाज केंद्रे बनली सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या
By Admin | Updated: December 10, 2014 01:06 IST2014-12-10T01:01:57+5:302014-12-10T01:06:36+5:30
पणजी : बार्देसपासून पेडणे तालुक्याच्या किनारपट्टीपर्यंत फोफावणारे पर्यटन हे तेथील पोलीस, लहान-मोठे लोकप्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते, पंचायती आणि गुन्हेगार यांच्या पथ्यावर पडत आहे.

क्लब, पब, मसाज केंद्रे बनली सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या
पणजी : बार्देसपासून पेडणे तालुक्याच्या किनारपट्टीपर्यंत फोफावणारे पर्यटन हे तेथील पोलीस, लहान-मोठे लोकप्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते, पंचायती आणि गुन्हेगार यांच्या पथ्यावर पडत आहे. क्लब, पब, नाईट मार्केट्स, मसाज केंद्रे पोलीस, राजकारणी व गुन्हेगारांना हप्त्याच्या रूपात सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या बनल्या आहेत.
किनारपट्टी भागात पोस्टिंग मिळावे म्हणून पोलिसांमध्ये जोरदार लॉबिंग चालते. सत्ताधारी पक्षाच्या आमदारास, मंत्र्यास हवा तो पोलीस निरीक्षक पोलीस स्थानकावर नेमला, की मग सगळीच कामे आपसूक होतात. लोकप्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते, गुन्हेगार व पोलीस यांची एक साखळी बार्देस ते पेडणे तालुक्याच्या किनारपट्टीत तयार झाली आहे. सगळेच लोकप्रतिनिधी या साखळीचे भाग नाहीत. मात्र, काही आमदार, एक मंत्री, काही पोलीस अधिकारी व काही गुन्हेगार यांची युती किनारपट्टीत सध्या सक्रिय आहे. आमदार मायकल लोबो यांच्यावर ज्याने हल्ला केला, त्याची कसून चौकशी झाली तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; पण सरकारला हे प्रकरण लवकर निभावलेले हवे आहे. लोबो यांच्यावरील हल्लेखोराचा विषय सरकारने व पोलिसांनी गंभीरपणे घेतला असता, तर हल्लेखोराविरुद्ध आणखी गंभीर कलमे लागू झाली असती व परिणामी त्याला जामीन मिळणेही कठीण झाले असते, अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.
काही पंचसदस्य, काही अन्य लोकप्रतिनिधी, काही रियल इस्टेट व्यावसायिक, काही गुन्हेगार, पोलीस यांची युती झाल्याने लोकही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून गप्प राहतात. एखाद्या हॉटेलसाठी रस्ता रुंद करून द्यायचा असेल, तर कळंगुट मतदारसंघात व विशेषत: हडफडे पंचायत क्षेत्रात ते काम लवकर होते; पण लोकांची एखादी मूलभूत समस्या सोडविण्याबाबत लोकप्रतिनिधी तत्परता दाखवत
नाहीत.
पंचायती ज्याप्रमाणे हॉटेल व्यावसायिक व अन्य प्रकल्पांना पीडतात, त्याचप्रमाणे काही लोकप्रतिनिधी, पोलीस आणि गुन्हेगारही विविध व्यावसायिकांना पिळत आहेत. त्यामुळे किनारपट्टीत एखादा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सर्वांना ‘प्रोटेक्शन मनी’ द्यावी लागते, असा अनुभव एका व्यावसायिकाने सांगितला.
(खास प्रतिनिधी)