गोव्याचा पाणीपुरवठा खंडित

By Admin | Updated: December 28, 2015 01:36 IST2015-12-28T01:36:42+5:302015-12-28T01:36:51+5:30

पावसाने यंदा दडी मारल्याने धरणात २ मीटर पाण्याचा तुटवडा झालेला असताना आतापासूनच पाणी जपून वापरा, अशा

Goa's water supply breaks | गोव्याचा पाणीपुरवठा खंडित

गोव्याचा पाणीपुरवठा खंडित

विशांत वझे ल्ल डिचोली
पावसाने यंदा दडी मारल्याने धरणात २ मीटर पाण्याचा तुटवडा झालेला असताना आतापासूनच पाणी जपून वापरा, अशा सूचना करण्याची वेळ गोव्यावर आली आहे. कारण तिळारीच्या भरंवशावर अवलंबून असलेल्या गोव्याला पुन्हा हादरा बसला आहे. तिळारी धरणापासून ९ किलोमीटर अंतरावर गोव्याकडे येणाऱ्या तिळारी कालव्याला मोठे भगदाड पडल्याने गोव्याला येणारे पाणी बंद करण्यात आल्याने गोव्याला पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे.
चार दिवसांपूर्वी साटेली-खानयाळे परिसरातील कालवा मोठ्या प्रमाणात खचला असून पाणी वाया जात आहे. येथे मोठे भगदाड पडल्याने दुरुस्तीकाम हाती घेतानाही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच गोव्याकडे येणारे पाणी बंद करून कालव्याची डागडुजी युद्धपातळीवर चालू करण्यात आली आहे. कालवा फुटताच तेथे तात्पुरता दगड-विटांचा थर रचून सिमेंटच्या पिशव्या बांधून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तयारी चालवली असली तरी एकूणच या बाबतीत महाराष्ट्र सरकाराने बेफिकिरी दाखवली असून वर्षातून किमान दोन ते तीन वेळा असे प्रकार घडतच आहेत. त्यामुळे गोव्याला पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे.
तिळारी धरणाचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली कालवा दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कालव्याच्या दुरुस्तीसाठी काही दिवस लागण्याची शक्यता असली तरी सोमवारी सायंकाळपर्यंत गोव्याचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचा दावा धरण अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. २०१४ साली खानयाळे साटेली येथे कालव्याला प्रचंड मोठे भगदाड पडल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत गोव्याचे पाणी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तातडीने जलसंसाधन खात्यामार्फत साळ नदीचे पाणी पंपिंग करण्याची योजना आखून शेती वाचवण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा पाणी बंद झाल्याने हा तिळारीच्या पाण्याचा द्रविडी प्राणायाम गोव्यासाठी तापदायक ठरला आहे. गोव्याने लाखो रुपये खर्च करून धरणग्रस्तांसाठी आर्थिक मदतीसाठी सहकार्य केलेले आहे. विस्थापितांना मदत केली आहे. मात्र, गोव्याला पाण्याची हमी मिळताना दिसत नाही. याबाबत राज्यातील शेतकरी बरेच नाराज आहेत.
डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी, तिळारीचे पाणी हे ‘राम भरोसे’ असल्याने गोव्याने स्वयंपूर्ण होण्यासाठी योजना आखण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

Web Title: Goa's water supply breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.