गोव्यातील खाण अवलंबितांचे दिल्लीतील आंदोलन उद्यापासून 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 08:28 PM2018-12-10T20:28:45+5:302018-12-10T20:29:00+5:30

वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे मंत्री, आमदार समर्थनार्थ भेट देणार 

Goa's mining dependent movement in Delhi | गोव्यातील खाण अवलंबितांचे दिल्लीतील आंदोलन उद्यापासून 

गोव्यातील खाण अवलंबितांचे दिल्लीतील आंदोलन उद्यापासून 

googlenewsNext

णजी : गोव्यातील खाणी पूर्ववत् सुरु व्हाव्यात या मागणीसाठी दिल्लीत निदर्शने करणार असलेल्या अवलंबितांना पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेतेही दिल्लीला रवाना होतील. आज आणि उद्या रामलीला मैदानावर आणि परवा गुरुवारी जंतरमंतरवर हे आंदोलन होणार आहे.

आज सकाळी वीजमंत्री निलेश काब्राल व दुपारी २.३0 वाजता गोवा फॉरवर्डचे तिन्ही मंत्री रामलीला मैदानावर अवंलबितांची भेट घेतील. 

 गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे नेते पुती गांवकर यांनी या प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार ६00 अवलंबित दिल्लीत पोचले असून आज सकाळी १0 वाजता आंदोलनाला सुरवात होईल. खाण कामगार, ट्रक, बार्जेसवरील कामगार यांचा भरणा आहे. खाण कामगारांनी आपला १ दिवसाचा पगार या आंदोलनासाठी दिलेला आहे. त्यातून आंदोलकांचे चहापाणी, नाश्ता, जेवण आणि निवास व्यवस्था याचा खर्च आम्ही भागवत आहोत, असे गांवकर यानी सांगितले. 

विरोधी पक्षनेते काँग्रेसचे बाबू कवळेकर, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार दिगंबर कामत तसेच पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार हे जंतरमंतरवरील निदर्शनांमध्ये सहभागी होतील. मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर तसेच उपाध्यक्ष नारायण सावंत यांनीही पाठिंब्यार्थ दिल्लीला भेट देण्याची तयारी दर्शविली आहे. शिवसेना खासदार संजय राऊन हेही १२ किंवा १३ रोजी येतील. आम आदमी पक्षाचे निमंत्रक एल्विस गोम्स हेही येतील. केंद्रीय आयुषमंत्री भाजपचे श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर तसेच खासदार नरेंद्र सावईकर हेही येतील, अशी माहिती गांवकर यांनी दिली. 

सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील ८८ खाण लीजेस रद्दबातल ठरविल्यानंतर गेल्या १५ मार्चपासून राज्यातील खाण व्यवसाय पूर्णपणे बंदच आहे. केंद्र सरकारने गोव्यातील खाणी सुरु करण्यासाठी वटहुकूम काढावा किंवा एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करावी, अशी अवलंबितांची मागणी आहे. 

Web Title: Goa's mining dependent movement in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.