रणजी सामन्यात गोव्याचा दारुण पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 20:44 IST2017-10-27T20:43:36+5:302017-10-27T20:44:23+5:30
पंजाबने पाडला फडशा; घरच्या मैदानावर एक डाव, १३३ धावांनी मानहानीकारक हार

रणजी सामन्यात गोव्याचा दारुण पराभव
पर्वरी : येथील जीसीए अकादमीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या चार दिवसीय रणजी सामन्यात यजमान गोव्याला पाहुण्या पंजाबकडून एक डाव आणि १३३ धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. घरच्या मैदानावर गोव्याच्या गोलंदाजांनी पूर्णपणे निराशा केली आणि फलंदाजांचे मर्यादित प्रयत्न पराभवाला कारणीभूत ठरले. या पराभवामुळे गोवा ड गटात २ गुणांसह शेवटून दुस-या स्थानावर ढकलला गेला आहे, तर एक सामना गमविण्याची नामुष्की आलेल्या पंजाबच्या संघाने या विजयामुळे ८ गुणांसह गटात तिस-या स्थानी झेप घेतली आहे.
काल नाबाद राहिलेल्या सगुण कामत (२६) व अमोघ देसाई (३) यांनी खेळपट्टीवर नांगर टाकण्याच्या इराद्यानेच फलंदाजी सुरू केली. मात्र पंजाबच्या गोलंदाजांनी नियोजनबद्ध मारा करताना या दोघांनाही बाद केले. सगुण कामत (३४) व अमोघ देसाई (१४) धावा काढून बाद झाले. त्यानंतर इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. अतिबचावात्मक पवित्रा अवलंबिल्याने त्यांनी विकेट फेकल्या. याला अपवाद ठरले ते दर्शन मिसाळ व रितुराज सिंग हे गोलंदाज. दोघांनीही टिच्चून फलंदाजी करत अखेरच्या विकेटसाठी संस्मरणीय भागिदारी रचली. मिसाळने १११ चेंडू खेळून काढत ८ चौैकार व १ षटकारासह नाबाद ६४ धावा केल्या, तर रितुराज सिंगने शेवटच्या क्र्मांकावर फलंदाजीस येउन अनपेक्षितरीत्या अर्धशतक झळकावले.
नववा गडी १६६ धावांवर बाद झालेला असताना रितुराज मैदानात आला. त्यावेळी केवळ एका विकेटवर विजय समीप आल्याने पंजाबच्या गोटात काहीशी शिथिलता आली. याचा फायदा उठवत त्याने ९ चौैकार व १ षटकार ठोकत ५१ धावा केल्या. या ९0 धावांच्या भागिदारीमुळे पंजाबचा विजय लांबला. शिवाय चौैथ्या दिवसअखेर सामना अनिर्णित सोडवून २ गुणांची कमाई करण्याच्या गोव्याच्या अशा पल्लवित झाल्या. मात्र विनय चौैधरीच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात रितुराज जीवनज्योत सिंगच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि गोव्याचा डाव २५६ धावांवर संपुष्टात आला.
पंजाबकडून विनय चौैधरी व रघु शर्मा यांनी प्रत्येकी ३, मनप्रित गोनीने २, तर सिद्धार्थ कौैलने १ गडी बाद केला. गोव्याचा पुढील सामना सेनादल विरुद्ध दिल्लीत ९ ते १२ नोव्हेंबर या दरम्यान होईल.