नववर्षासाठी पर्यटकांची गोव्यालाच प्रथम पसंती

By Admin | Updated: December 26, 2014 02:10 IST2014-12-26T02:04:22+5:302014-12-26T02:10:26+5:30

पणजी : नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती गोवाच आहे. रशियन चलनाचे दर घसरल्याने विदेशी पर्यटकांची संख्या घटली असली तरी देशी पाहुणे मात्र मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झालेले आहेत.

Goa's first choice is for tourists for the new year | नववर्षासाठी पर्यटकांची गोव्यालाच प्रथम पसंती

नववर्षासाठी पर्यटकांची गोव्यालाच प्रथम पसंती

पणजी : नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती गोवाच आहे. रशियन चलनाचे दर घसरल्याने विदेशी पर्यटकांची संख्या घटली असली तरी देशी पाहुणे मात्र मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झालेले आहेत. किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नाताळच्या पूर्वसंध्येपासून पार्ट्यांची धूम सुरू झालेली आहे.
पर्यटन विशेष रेल्वे २९ पासून
मुंबई-गोवा पर्यटकांसाठी असलेली विशेष रेल्वे २९ रोजी रात्री ११ वा. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १0 वा. मडगावला पोहोचेल. सुरुवातीला आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे धावणार असल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले.
जगभरात प्रसिद्ध सनबर्न पार्टी २७ डिसेंबर रोजी सुरू होणार असून, चार दिवस ती चालणार आहे. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे चौथ्या दिवशी गोमंतकीयांनाही या पार्टीत सहभागी होता येईल. नववर्ष साजरे करण्यासाठी सिनेकलाकार, राजकीय नेते गोव्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काही दिवस येथे सेलेब्रिटींचीही धूम असणार आहे. चार दिवसांचा व्हीएच वन सुपरसोनिक डान्स फेस्टिव्हलही २७ रोजी सुरू होत आहे. आंतरराष्ट्रीय कलाकार पॉल वॅन डिक, डॅश बर्लिन आदी तीत सहभागी होतील. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने गोव्यात येण्याचा आपला बेत जाहीर केलेला आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या दरवर्षी नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात येतात. महाराष्ट्राचे अनेक मंत्रीही गोव्यालाच पसंती देतात. आजी-माजी न्यायमूर्तीही नववर्षाच्या पूर्वसंध्येला गोव्यात आवर्जून हजेरी लावत असतात.
नोकरी, धंद्यानिमित्त मुंबई, पुणे, बंगळुरू, तसेच देशातील इतर भागात आणि विदेशात स्थायिक झालेले गोमंतकीय नाताळाला गोव्यात परततात. राज्यात नाताळची धामधूम सुरू झाली आहे. खासगी, तसेच
गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटेल्सचे आरक्षण फुल्ल झालेले आहे.
उत्तर भारतीय पर्यटकांची संख्या जास्त आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याला विचारले असता ते म्हणाले की, नाताळ, नववर्षाच्या काळातच गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या आठ लाखांवर जाते.
आॅक्टोबरमध्ये विकएंडला सलग सुट्ट्या आल्याने पर्यटकांची संख्या इतकी वाढली की, नाताळ, नववर्षातील पर्यटकांचा विक्रमही तोडला गेला. (प्रतिनिधी)

Web Title: Goa's first choice is for tourists for the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.