पाच लाख गावांत पोहोचण्याचे लक्ष्य
By Admin | Updated: December 28, 2014 09:37 IST2014-12-28T09:36:40+5:302014-12-28T09:37:59+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेमंत शिबिराचा समारोप

पाच लाख गावांत पोहोचण्याचे लक्ष्य
पणजी : आतापर्यंत ४० हजार गावांत पोहोचलेला संघ हा ५ लाख गावांत पोहोचण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी संघाच्या कामाला अधिक गतीची आवश्यकता असल्याचे संघाचे क्षेत्रीय बौद्धिक प्रमुख डॉ शरद कुंटे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेमंत शिबिराच्या समारोपप्रसंगी सांगितले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, सभापती राजेंद्र आर्लेकर आणि उपसभापती अनंत शेट या कार्यक्रमाला उपस्थित होते.
तीन दिवसांच्या संघाच्या उत्तर गोवा जिल्ह्याच्या हेमंत शिबिराचा शनिवारी समारोप झाला. या समारोप सत्रासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. दीप भंडारे होते. संघाचे पश्चिम क्षेत्रीय बौद्धिक प्रमुख डॉ. कुंटे यांनी समारोपप्रसंगी संघाचे आतापर्यंतचे कार्य, ध्येय, आणि कार्यपद्धती याविषयी माहिती दिली. विकासाच्या दृष्टीने जपान, चीन आणि इस्रायल सारख्या देशांच्या तुलनेत मागे राहण्याची विविध कारणे त्यांनी विषद केली. आपल्या समाजाची धारणा आणि त्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अथक परिश्रमांची गरज त्यांनी व्यक्त केली.
सामाजिक परिवर्तन हे काही समाजातील एका घटकाची जबाबदारी नव्हे, एखाद्या सरकारची जबाबदारी नव्हे तर ती समाजाच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. सुसंस्कारित, सामाजिक बांधिलकी जपणारी पिढी जोपर्यंत घडणार नाही, तोपर्यंत सामाजिक परिवर्तन शक्य नाही. संस्कारित पिढी घडविण्याचे काम संघ करीत असून योग्य दिशेने चाललेल्या या प्रयत्नांना गतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा विभागाचे संघचालक सुभाष वेलिंगकर, उत्तर गोव्याचे संघचालक राजू सिकेरकर, जिल्हा कार्यवाह सूर्यकांत गावस या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
(प्रतिनिधी)