समुद्राच्या मदतीनेच भवितव्य बदलण्याचे ध्येय : हर्षवर्धन
By Admin | Updated: January 2, 2015 01:11 IST2015-01-02T01:08:18+5:302015-01-02T01:11:12+5:30
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचा पन्नासावा वर्धापनदिन

समुद्राच्या मदतीनेच भवितव्य बदलण्याचे ध्येय : हर्षवर्धन
पणजी : समुद्रात विविध तऱ्हेचे घटक असतात विज्ञान सांगतो. विज्ञानाच्या या शिकवणीप्रमाणे समुद्राच्या मदतीनेच आम्ही आमचे भवितव्य बदलण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. समुद्र आणि समुद्रातील धातंूच्या साहाय्याने येणाऱ्या काळात अनेक आव्हानांशी लढा देता येऊ शकतो. समुद्र विज्ञानाला जवळून जाणून घेण्यासाठी हल्ली चांगली कामगिरी बजावण्यात येत आहे. विज्ञान आणि समाजाला एकमेकांशी परिचित करून देणे आवश्यक आहे, असे समुद्र विज्ञान संस्थेचे उपाध्यक्ष व विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
दोनापावल येथील राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या पन्नासाव्या वर्धापनदिन कार्यक्रमानिमित्त ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. या वेळी एनआयओचे संचालक डॉ. नक्वी,
डॉ. राजीव निगम, डॉ. जयंत सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.
हर्षवर्धन म्हणाले, हजारो वर्षांपूर्वीपासून भारत हा ज्ञानाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ज्ञानाची लालसा असणारे विदेशी बांधवही भारतात ज्ञान ग्रहण करण्यासाठी येतात. आमचे शास्त्रज्ञ, त्यांचे विज्ञान ज्ञान आमच्या पिढीपर्यंत पोचवू लागले आहेत. औषध, समुद्र संशोधनासारख्या विषयांवर भारत प्रतिनिधित्व करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहस्त्रबुद्धे म्हणाले, एनआयओसारख्या संस्था विज्ञान क्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजावतात. पन्नास वर्षांपूर्वी स्व. लालबहादूर शास्त्री यांनी ही संस्था स्थापन व्हावी म्हणून प्रयत्न केले होते. आज एनआयओचे चांगल्यापैकी काम सुरू आहे. संस्थेच्या योजनेमुळे देशाचे नाव समुद्र विज्ञान संस्थांनात प्रगती साधणार, असे ते म्हणाले.
सहस्त्रबुद्धे, डॉ. निगम आणि डॉ. नक्वी यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. ‘एनआयओ अचिव्हमेंट’ या पुस्तकाचे राजमोहन यांनी प्रकाशन केले. नक्वी यांनी स्वागत केले, तर राहुल शर्मा यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)