गोव्याचा पर्यटन हंगाम सुरु; रशियाचे पहिले चार्टर विमान २१८ पर्यटकांना घेऊन दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 02:09 PM2019-10-04T14:09:58+5:302019-10-04T14:11:32+5:30

अखिल गोवा हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले, थॉमस कुक कंपनी बंद पडल्याने किमान ४०,००० ब्रिटिश पर्यटक यावर्षी कमी होतील.

Goa tourism season begins; Russia's first charter plane carrying 218 tourists | गोव्याचा पर्यटन हंगाम सुरु; रशियाचे पहिले चार्टर विमान २१८ पर्यटकांना घेऊन दाखल

गोव्याचा पर्यटन हंगाम सुरु; रशियाचे पहिले चार्टर विमान २१८ पर्यटकांना घेऊन दाखल

Next

पणजी : गोव्याचा पर्यटन हंगाम आजपासून सुरू झाला असून रशियामधून २१८ पर्यटकांना घेऊन पहिले चार्टर विमान आज सकाळी दाबोळी विमानतळावर उतरले. येत्या ११ रोजी रशियाचे दुसरे चार्टर विमान येणार असून त्यानंतर प्रत्येक आठवड्याला नऊ चार्टर विमाने दाखल होतील.

गोव्यात दरवर्षी साधारणपणे ६ लाख विदेशी तर ७० लाख देशी पर्यटक भेट देत असतात. विदेशी पाहुण्यांमध्ये गोव्याला भेट देणाऱ्यांमध्ये रशियन नागरिकांची संख्या जास्त असते. त्यापाठोपाठ ब्रिटिश पर्यटकांचा क्रमांक लागतो. दरम्यान, ब्रिटिश पर्यटकांना गोव्यात आणणारी थॉमस कूक ट्रॅव्हल कंपनी बंद पडल्यानंतर आता टुई ही आणखी एक ब्रिटिश ट्रॅव्हल कंपनी गोव्यातील चार्टर विमाने बंद करण्याच्या विचारात आहे. कारण दाबोळी विमानतळावर नौदलाने धावपट्टीची वेळ बदलली आहे. 

टूर्स अँड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा  या संघटनेचे अध्यक्ष सावियो मेशियस यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्तक्षेपाची मागणी आम्ही केलेली आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, येत्या 2 नोव्हेंबरपासून नौदलाने या विमानतळावरील धावपट्टीची वेळ बदललेली आहे. दाबोळी विमानतळ नौदलाच्या अखत्यारीत येतो. मात्र असे असले तरी अशा प्रकारचे निर्बंध घालताना किमान सहा महिने आधी नोटीस द्यायला हवी,  असे मेशियस म्हणाले. नौदलाने स. ७.३० ते दु.२.३० या वेळेत देखभाल दुरुस्तीसाठी विमानतळ नागरी विमानांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन हंगामात दर शनिवारी टुई  एअरलाइन्सचे विमान

सकाळी ११.३० वाजता पोहोचते त्यामुळे त्यांना हे चार्टर विमान लँड करता येणार नाही. थॉमस कूक ब्रिटिश ट्रॅव्हल कंपनी बंद झाल्यामुळे सुमारे १०० कोटींचे नुकसान गोव्याला होणार असा अंदाज आहे. गोव्याला भेट देणारे अर्धेअधिक पर्यटक थॉमस कूकच्या चार्टर विमानांनी गोव्यात येत असत. गेली पंचवीस वर्षे ही कंपनी चार्टर विमाने गोव्यात आणत होती. आतापर्यंत 50 ते 60 हजार चार्टर विमाने या कंपनीने गोव्यात आणली.

अखिल गोवा हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले, थॉमस कुक कंपनी बंद पडल्याने किमान ४०,००० ब्रिटिश पर्यटक यावर्षी कमी होतील. अर्थात दुसर्‍या चार्टर कंपनी तयार होतील परंतु तोपर्यंत वेळ आहे.  रशियन चार्टर विमाने सुरू झाली असली तरी रशियाचे पर्यटक जास्त खर्च करत नाहीत. त्या तुलनेत ब्रिटिश पर्यटक मोठ्या प्रमाणात खर्च करतात आणि त्याचा गोव्यातील पर्यटन उद्योगांना फायदा होतो. रशियन पर्यटक एक तारांकित किंवा दोन तारांकित अशा छोट्या हॉटेलांमध्ये राहतात. रशियन चार्टर विमानांमधून येणारे पर्यटक हे कारागीर, पेंटर अशा पद्धतीचे लहान व्यवसायिक पैशांची बचत करून फिरायला आलेले असतात. त्यामुळे ते जास्त खर्च करत नाही. थॉमस कूक बंद पडली हा यंदाच्या पर्यटन महोत्सवाला मोठा फटका आहे.

‘ गेल्या वर्षी पर्यटक हंगामात एक हजारहून जास्त चार्टर विमाने आल्याची माहिती मेशियस यांनी दिली.  गेल्या हंगामात ऑक्टोबरमध्ये ५३ चार्टर विमाने आली तर नोव्हेंबरमध्ये २३0 चार्टर विमाने दाबोळीवर उतरली. २0१७ ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अनुक्रमे ही संख्या १0५ व ३१८ होती. पहिल्या दोन महिन्यात ५२,७६८ विदेशी पर्यटक आले. गेल्या वर्षी वरील दोन महिन्यात ही संख्या ८२,0५७ एवढी होती. २0१५-१६ साली केवळ ७९८ चार्टर विमाने आली. दरवर्षी गोव्याचे पर्यटनमंत्री, अधिकारी विदेशात पर्यटन मेळ्यांमध्ये सहभागी होत असतात. ज्या देशात जातील तेथे ‘रोड शो’ करतात. परंतु त्याचे फलित मात्र दिसत नाही, अशी तक्रार आहे. पर्यटन व्यावसायिकांनी या प्रकाराला सरकारचे चुकीचे मार्केटिंग धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. 

Web Title: Goa tourism season begins; Russia's first charter plane carrying 218 tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.