गोवा शांतता, एकोप्याचे प्रतीक: मुख्यमंत्री सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2024 12:35 IST2024-12-04T12:33:02+5:302024-12-04T12:35:58+5:30
जुने गोवेत सेंट झेवियर फेस्ताला सुरुवात

गोवा शांतता, एकोप्याचे प्रतीक: मुख्यमंत्री सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : यंदा सेंट फ्रान्सिस झेवियर शवदर्शन सोहळा आयोजित केला असून त्याची सुरुवात २१ नोव्हेंबर पासून झाली आहे. सरकारने या आयोजनासाठी केलेल्या तयारीचा चर्चचे फादर, कार्डिनल यांनीही कौतूक केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा सोहळा आहे. गोवा हा शांती, निसर्ग तसेच एकोप्यासाठी ओळखला जातो. गोवा त्याचे प्रतिक आहे. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम सर्व धर्मिय एकोप्याने राहतात. हाच खरा गोवा असून आम्ही सर्वजण एक असून हाच संदेश सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या फेस्ताद्वारे दिला जात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्तला मंगळवारी हजाको भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. या फेस्तनिमित बॅसिलिका ऑफ बॉम जिजस चर्च परिसर भाविकांनी अक्षरशः व्यापून गेला होता. फेस्तच्या पार्श्वभूमीवर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. यात सशस्त्र पोलिसांचाही समावेश आहे. भाविकांची तेथे मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करुनच त्यांना चर्चच्या आत सोडले जात आहे. शवदर्शन सोहळा आणि फेस्तसाठी एक हजारांहून अधिक पोलिस तैनात केले आहेत.
गोंयच्या सायबाच्या फेस्तची मुख्य प्रार्थना सभा सकाळी बॅसिलिका ऑफ बॉम जिजस चर्च परिसरात झाली. त्याला राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई, मंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार एल्टन डिकॉस्टा, आमदार राजेश फळदेसाई, आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा, आमदार विरेश बोरकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, चर्चिल आलेमाव तसेच इतर मंत्री, आमदार उपस्थित होते.
पोपची भेट अपेक्षित
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवदर्शनासाठी गोवा सरकार व चर्च दरम्यानचा समन्वय पाहता पोप लवकरच भारताच्या दौऱ्यावर येतील अशी अपेक्षा आहे. त्यांची गोवा भेट अपेक्षित आहे. कार्डिनल यांनीदेखील पोप यांना भारत दौऱ्याविषयीचा संदेश देतील असे आश्वासन दिले असल्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
गोंयकारपण वाचवावे
फेस्तात दिसणारा सर्व धर्माचा एकोपा तसेच गोंयकारपण टिकून रहावे. गोंयच्या सायबानेच गोंयकारपण वाचवावे. सरकारमधीलच काही जण शांतता भंग करु पहात आहे. त्यांना आता गोंयच्या सायबानेच चांगली दिशा दाखवावी. म्हणजे जनतेला चांगले भविष्य मिळेल, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष सरदेसाई यांनी यावेळी नमूद केले.