२८ हजार कोटी राज्याला हवेत; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती, सोळाव्या वित्त आयोगासमोर प्रस्ताव मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2025 07:45 IST2025-01-04T07:44:13+5:302025-01-04T07:45:08+5:30
मुख्य सचिव, खाते प्रमुखांच्या बैठकीत घेतला आढावा

२८ हजार कोटी राज्याला हवेत; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती, सोळाव्या वित्त आयोगासमोर प्रस्ताव मांडणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सोळाव्या वित्त आयोगाकडे विविध खात्यांसाठी राज्य सरकार तब्बल २८ हजार कोटी रुपयांची मागणी करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. येत्या ९ व १० रोजी सोळाव्या वित्त
आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगरिया गोवा दौन्यावर येत असून त्यांच्यासमोर प्रस्तावांचे सादरीकरण केले जाणार आहे. यासंबंधी तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी घेतला. बैठकीस मुख्य सचिव व्ही. कांडावेलू तसेच प्रशासनातील विविध खात्यांचे सचिव, खाते प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या आर्थिक गरजा, प्रकल्प प्रस्ताव आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी वाढीव निधी यावर प्रकाश टाकून राज्याच्यावतीने करण्यात येणाऱ्या सादरीकरणावर चर्चा झाली. ९ रोजी आयोगासमोर सादरीकरण केले जाईल. आयोगाचे अध्यक्ष डॉ. पनगरिया यांच्या विविध घटकांसोबत बैठका होणार आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा राज्य उशिरा स्वतंत्र झाल्याने पहिले दोन वित्त आयोग गोव्याला चुकले. त्यामुळे फार मोठे नुकसान झालेले आहे. गोव्याची लोकसंख्या १६ लाख असली तरी येथे भेट देणारे पर्यटक तसेच स्थलांतरित मजूर मिळून वर्षाकाठी एक कोटी अतिरिक्त लोक गोव्यात असतात. त्यामुळे वित्त आयोगाने याचाही विचार करून जादा निधी द्यावा, अशी मागणी आम्ही करणार आहोत. सर्व सरकारी खात्यांनी आपापले प्रकल्प प्रस्ताव पाठवले आहेत. येत्या सोमवारी पुन्हा मी बैठक घेऊन अंतिम सादरीकरण पाहीन.