‘गोवा शिपयार्ड’ विश्वसनीय वास्को : ‘गोवा शिपयार्ड’ ही
By Admin | Updated: November 11, 2015 00:55 IST2015-11-11T00:55:08+5:302015-11-11T00:55:19+5:30
भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली असून

‘गोवा शिपयार्ड’ विश्वसनीय वास्को : ‘गोवा शिपयार्ड’ ही
भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली असून ही कंपनी आपल्या उत्पादनांचा दर्जा राखतानाच वेळेत काम पूर्ण करीत असल्याने विश्वासास पात्र ठरली आहे. त्यामुळेच संरक्षण मंत्रालयाने ३२ हजार कोटींचे भारतीय बनावटीच्या ६ गस्तीनौका बांधण्याचे कंत्राट दिले आहे. हे
काम गोवा शिपयार्ड वेळेत पूर्ण
करेल, असे संरक्षणमंत्री मनोहर
पर्रीकर यांनी सांगितले.
गोवा शिपयार्ड कंपनीच्या परिसरातील नव्यानेच बांधण्यात आलेल्या जेटीवर मंगळवारी सकाळी भारतीय तटरक्षक दलासाठी बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक वर्गातील सहापैकी पहिल्या उपतटीय गस्तीनौका ‘समर्थ’ भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल करुन घेण्याच्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर, दक्षिण गोव्याचे खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, मच्छीमार खात्याचे मंत्री आवेर्तान फुर्तादो, आमदार कार्लुस आल्मेदा, व्हाईस अॅडमिरल एसपीएस चिमा तसेच इतर अधिकारी
उपस्थित होते.
भारतीय तटरक्षक दलासाठी १०५ मीटर लांबीच्या सहा तट गस्तीनौका बांधण्याचे काम गोवा शिपयार्ड कंपनीला देण्यात आले असून या सहाही नौका पूर्णपणे भारतीय बनावटीच्या अत्याधुनिक यंत्रणेने बांधण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एका गस्तीनौकेचे जलावतरण तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामावून घेण्यात आली आहे. ही गस्तीनौका तटरक्षक दलाच्या गोवा विभागाकडे देण्यात येणार असून तटरक्षक दल किनारा पर्यावरणीय संरक्षणासाठी तसेच त्यांच्या इतर कार्यासाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे. तुर्तास तटरक्षक दलाच्या ताफ्यात ११७ जहाजे असून देशातील विविध शिपयार्डमध्ये ७४ गस्तीनौका बांधण्याचे काम चालू आहे. नव्यानेच बांधण्यात आलेल्या पहिल्या गस्तीनौका ‘समर्थ’ या जहाजावर १४ अधिकारी, तसेच ९८ खलाशी असून या नौकेचे नेतृत्व उपमहानिर्देशक राकेश पाल हे पश्चिम विभागीय तटरक्षक दलाच्या अधिकाराखाली करणार आहेत. गोवा शिपयार्ड कंपनीचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक शेखर
मित्तल यांनी स्वागत केले. या वेळी तटरक्षक दलाचे व्हाईस अॅडमिरल बिश्त यांनीही आपल्या भाषणात
गोवा शिपयार्डचा गौरव केला.
(प्रतिनिधी)