गोवा शिपयार्ड भविष्यात ‘हॉवरक्राफ्ट’ केंद्र
By Admin | Updated: November 15, 2014 02:05 IST2014-11-15T01:57:19+5:302014-11-15T02:05:44+5:30
पर्रीकरांचा सत्कार : दाबोळीचे ‘आयएनएस हंसा’, मुरगाव बंदरातील गोवा विभागीय तटरक्षक दलास भेट

गोवा शिपयार्ड भविष्यात ‘हॉवरक्राफ्ट’ केंद्र
वास्को :गोवा शिपयार्ड ही संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाराखाली येत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील एक चांगली कंपनी आहे. या कंपनीतील तांत्रिक अधिकारी सक्षम असूनही या जहाज बांधणी कंपनीला नव्या नौदल बोटी बांधण्याच्या आर्डर्स का देण्यात येत नाहीत याची चौकशी करण्यात येईल़ तसेच हे भविष्यात हॉवरक्राफ्ट तयार करण्याचे भारतातील प्रमुख केंद्र बनण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.
भारताचे ३६वे सरंक्षणमंत्री म्हणून पदभार सांभाळल्यानंतर प्रथमच गोवा भेटीवर आलेले मनोहर पर्रीकर यांचा शुक्रवारी सकाळी गोवा शिपयार्ड या संरक्षण मंत्रालयाच्या आखात्यारित असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने सत्कार सोहळा आयोजित केला होता. या वेळी संरक्षणमंत्री पर्रीकर बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर दक्षिण गोव्याचे खासदार अॅड़ नरेंद्र सावईकर, गोवा शिपयार्ड कंपनीचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक रिअर अॅडमिरल (निवृत्त) शेखर मित्तल, मंत्री मिलिंद नाईक, एलिना साल्ढाणा, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा उपस्थित होते.
संरक्षणमंत्री पर्रीकर म्हणाले, गोवा शिपयार्ड या कंपनीकडे सर्व साधनसुविधा उत्कृष्ट आहेत़ मोठी जहाजे बांधण्याचे सामर्थ्य या कंपनीकडे आहे़ या कंपनीविरुध्द भ्रष्टाचाराच्या तक्रारी दक्षता खात्याकडे नाहीत, तरीही त्यांना नवीन बोटी बांधण्याच्या आॅर्डर्स मिळालेल्या नाहीत. तर इतर शिपयार्डना नौदलासाठी नव्या ४१ बोटी बांधण्याच्या आॅर्डर्स मिळाल्या आहेत़
गोवा शिपयार्ड या कंपनीचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक शेखर मित्तल म्हणाले, पर्रीकर हे संरक्षणमंत्रिपदाची शपथ घेताना डोळ्यातून आनंदाश्रू आले; कारण पर्रीकर हे संरक्षणमंत्री बनल्याने आता गोवा शिपयार्डला ‘अच्छे दिन’ येणार असल्याची कल्पना डोळ््यासमोर उभी राहिली होती. गोवा शिपयार्ड कंपनीची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी अनाथ अवस्था केली असून आमची व्यथा समजून घेणारी व्यक्ती आता उच्चपदी असल्याचे त्यांनी गर्वाने सांगितले. गोवा शिपयार्ड ही कामगारांची एक जीवन वाहिनी असून या कंपनीचा जितका दर्जा उंचविणार तितकीच कामगारांची स्थिती सुधारणार आहे़, असे ते म्हणाले.
या वेळी गोवा शिपयार्ड कामगार संघटनेतर्फे किशोर शेट, अधिकारी संघटनेतर्फे विनायक नाईक यांनीही मार्गदर्शन केले. गोवा शिपयार्डचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक शेखर मित्तल यांनी संरक्षणमंत्री पर्रीकर यांना फेटा तसेच शाल देऊन त्यांचा सत्कार केला.
या वेळी मंत्री पर्रीकर यांच्या हस्ते फिरत्या आरोग्य कल्याण प्रकल्पाअंतर्गत आरोग्य मित्र दंत वाहनाचे उद्घाटन झाले.
या वेळी गोवा शिपयार्डतर्फे आयोजित कृषी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची माहिती देणारे प्रदर्शन भरविले होते. त्याला मंत्री पर्रीकर यांनी भेट दिली.