लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करण्यासाठी 'डीप ट्रेस' महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. एआयसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता गोवापोलिसांना तपासात मोठी मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
'डीप ट्रेस' या एआय आधारित उपक्रमाचे आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी अनावरण केले. गोवा हे लहान राज्य असले तरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत गोवा पोलिस खाते हे देशात मॉडेल ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता व अन्य अधिकारी उपस्थित होते.
'डीप ट्रेस' हा उपक्रम राबवणारे गोवा हे पहिले राज्य आहे. एआय तसेच अन्य तंत्रज्ञानाच्या मदतीने केवळ गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करणेच नव्हे तर गुन्हे रोखण्यातही फायदेशीर ठरणार आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याचा वापर सुरू झाला. त्यानुसार सायबर गुन्हे, वाहतुकीसंबंधी तसेच इतर प्रकारच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात ते महत्त्वाचे ठरले आहे. विशेष करून हा उपक्रम संवेदनशील प्रकरणांचा तपास करण्यास उपयोगी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा पोलिसांना सरकारचा नेहमीच पाठिंबा आहे. मग त्यात मनुष्यबळ असो किंवा पायाभूत सुविधा. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे सरकार नेहमीच पोलिस दलाला सहकार्य करत असल्याचे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले.
'डीप ट्रेस'चा वापर
'डीप ट्रेस' हे पहिले एआय-संचालित तपास साधन आहे. मोबाईल नंबर, पॅन कार्ड, वाहन क्रमांक आणि इतर ओळखपत्रांशी जोडलेल्या सार्वजनिकरीत्या उपलब्ध डेटाचा वापर करून एखाद्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींच्या डिजिटल पाऊलखुणा शोधण्यास याचा वापर केला जातो. याद्वारे त्याची संपूर्ण माहिती जसे नाव, पत्ता, यूपीआय आयडी, रोजगार आदी माहिती प्राप्त होते. त्यामुळे गुन्ह्याचा जलद तपास होण्यास मदत होते.
भाडेकरूंसाठी लवकरच अॅप येणार
पुढील महिन्यात गोवा पोलिस हे भाडेकरू पडताळणी अॅप सुरू करणार आहे. या अंतर्गत भाडेकरूंची पडताळणी करण्याबाबतची कागदपत्रे ऑनलाईन अपडेट करता येतील. नागरिकांची सुरक्षा, परप्रांतीय भाडेकरूंची पडताळणी यादृष्टीने ते महत्त्वाचे ठरेल असे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी नमूद केले.