ट्रकची धडक टाळण्याच्या प्रयत्नात पोलीस शिपाई थेट ४५ फूट खोल विहिरीत पडला; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 06:02 PM2020-07-26T18:02:17+5:302020-07-26T18:02:30+5:30

समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक चुकवताना शिपाई विहिरीत पडला

in goa police constable falls in 45 deep well survives after fire brigade help | ट्रकची धडक टाळण्याच्या प्रयत्नात पोलीस शिपाई थेट ४५ फूट खोल विहिरीत पडला; अन्...

ट्रकची धडक टाळण्याच्या प्रयत्नात पोलीस शिपाई थेट ४५ फूट खोल विहिरीत पडला; अन्...

Next

म्हापसा : ‘देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय देणारी घटना म्हापसा येथे एका पोलीस शिपाईच्या बाबतीत घडली आहे. गोवा पोलिसात कार्यरत असलेला हा शिपाई ४५ फूट खोल विहिरीत पडला. पण दैव बलवत्तर म्हणून स्वप्नील सुखरूप वाचला.

प्राप्त माहितीनुसार, मुशीरवाडा-कोलवाळ येथे राष्ट्रीय महामार्गजवळील विहिरीत पडलेल्या पोलीस शिपाई स्वप्नील गांवस (२९, नावेली-साखळी) यांना म्हापसा अग्नीशमन दलाच्या जवानांनी साडेचार तासांनी सुखरूप बाहेर काढले. हा विचित्र अपघात रविवारी (दि.२६) पहाटे ५.३० च्या सुमारास घडला.
 
जखमी स्वप्नील गांवस जुन्या गोवा पोलीस स्थानकात कार्यरत आहेत. रात्रीची सेवा बजावून ते वझरी पेडणे येथे सासूरवाडीला जाताना हा अपघात घडला. राष्ट्रीय महामार्गावरून पेडणेच्या दिशेने जखमी गावस हे (जीए ०४ डी ६९३१) क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी वाटेत मुशीरवाडा येथे पुलाजवळ समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रक त्यांच्या अंगावर आला असता या ट्रकपासून स्वत:चा बजाव करण्यासाठी गांवस यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली.

यावेळी त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी रस्त्याच्या बाजूच्या झाडा-झुडपात गेली. दुचाकीस्वार गांवस हे मोटारसायकल वरून उसळून नेमके जवळच्या विहिरीत पडले. तर दुचाकी झुडपात अडकून राहिली. महामार्गपासून चार पाच मीटरवर ही ४५ फूट खोल विहीर आहे.
 
म्हापसा अग्नीशमन दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत, सुरज शेटगांवकर, सुरज कारापूरकर, गिरीश गावस व नितीन चोडणकर यांनी विहिरीत शिडी घालून तसेच जखमीला लाईफ जॅकेट व हेल्मेट देऊन त्यांना वरती काढले. त्यानंतर हा युवक पोलीस शिपाई असल्याचे स्पष्ट झाले. जखमी स्वप्नील गांवस याच्या उजव्या पायाला जखम झाली. त्यामुळे त्यांना जिल्हा इस्पितळातून पुढील उपचारार्थ गोमेकॉत पाठविले. सध्या तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचा पंचनामा पोलीस हवालदार भगवान शेटकर यांनी केला.

शिटीमुळे शिपायाचा जीव वाचला
- या विहिरीत चार ते पाच फूट पाणी होते. पाण्यात पडल्याने गांवस याचा खिशातील मोबाईलही भिजला. त्यामुळे त्यांनी स्वत: जवळील शिटी वाजवून व मोठ-मोठ्याने आरडाओरडा करून मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. पण, लोकांना त्यांच्या शिटीचा आवाज ऐकू आला. परंतु हा आवाज नेमका कुठून येतो याची कल्पना येत नव्हती.
 - सकाळी नऊच्या सुमारास विहिरी शेजारील घरातील एक व्यक्ती दुचाकी धुवत होती. त्याला या शिटीचा आवाज आला. तसेच बाजूला झाडांमध्ये पडलेली दुचाकीही त्याच्या नजरेस पडली. त्या शिटीच्या आवाजाच्या दिशेने ती व्यक्ती गेली असता त्याला विहिरीत एक युवक असल्याचे आढळले. त्यानंतर त्याने लगेच अग्नीशमन दल व पोलिसांना पाचारण केले.

Web Title: in goa police constable falls in 45 deep well survives after fire brigade help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.