Goa: गोव्यात आयआयटीसाठी सांगेत नवीन जागा, मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली माहिती
By किशोर कुबल | Updated: September 26, 2023 14:49 IST2023-09-26T14:49:01+5:302023-09-26T14:49:15+5:30
Goa News: गोव्यात आयआयटीसाठी सांगे मतदारसंघात नव्या ठिकाणी १० लाख चौरस मिटर जमीन मिळाली आहे. ती निश्चित झाल्यानंतर येत्या महिनाभरात मुख्यमंत्री त्यासंबंधीची घोषणा करतील.

Goa: गोव्यात आयआयटीसाठी सांगेत नवीन जागा, मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली माहिती
- किशोर कुबल
पणजी - गोव्यात आयआयटीसाठी सांगे मतदारसंघात नव्या ठिकाणी १० लाख चौरस मिटर जमीन मिळाली आहे. ती निश्चित झाल्यानंतर येत्या महिनाभरात मुख्यमंत्री त्यासंबंधीची घोषणा करतील.
स्थानिक आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी ही माहिती दिली. याआधी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने सांगे येथे सूचवलेली जमीन अयोग्य व अपुरी ठरवत नाकारली. परंतु आयआयटी सांगेतच व्हायला हवी, याबाबत फळदेसाई हे ठाम आहेत. त्यांनी पदरमोड करुन जमीन देण्याची तयारीही दाखवली होती.
‘जुनी जमीन लोकांच्या विरोधामुळे नव्हे तर अपुरी असल्याने फेटाळण्यात आली. ४ लाख चौरस मिटर जमीन डोंगराळ होती व तेथे ‘नो डेव्हलॉपमेंट झोन’ अर्थात बांधकाम निषिध्द विभागात येत होती त्यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नाकारली होती.’, असे फळदेसाई म्हणाले. नवीन जागेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पायाभरणीची तारीख वगैरे केंद्र सरकारच ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आयआयटीसाठी किमान दहा ते बारा लाख चौरस मिटर जमीन आवश्यक आहे. परंतु राज्य सरकारने केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाला गोवा हे लहान राज्य असल्याचे व येथे जमिनीची कमतरता असल्याचे पटवून देत ८ लाख चौरस मिटर जमिनीसाठी राजी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ही माहिती दिली होती.