मुंबई-कोकण महामार्ग काँक्रिटीकरणात गोवाही
By Admin | Updated: December 19, 2014 03:43 IST2014-12-19T03:42:01+5:302014-12-19T03:43:55+5:30
ढवळीकर : नितीन गडकरी यांच्याशी बैठक यशस्वी

मुंबई-कोकण महामार्ग काँक्रिटीकरणात गोवाही
पणजी : मुंबई ते कोकण अशा महामार्गाचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पात गोव्यातील २५२ किलोमीटरच्या मार्गाचा समावेश करावा, अशी मागणी गोवा सरकारने केंद्राकडे केली आहे. त्या दृष्टीने दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी यशस्वी बैठक झाल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ढवळीकर व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी गडकरी यांची बैठक झाली तेव्हा केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्रालयाचे डायरेक्टर जनरल तसेच मुख्य अभियंते, अन्य वरिष्ठ अधिकारी आणि गोव्याचे मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर उपस्थित होते.
मुंबई ते कोकण अशा मार्गाच्या काँक्रिटीकरणाची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने आखली आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाच्या या कामात गोव्यातील २५२ किलोमीटरचा मार्गही समाविष्ट केला जावा, अशी मागणी आम्ही केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर ठेवली. त्याविषयी खूप चर्चा झाली. ही मागणी केंद्राने तत्त्वत: मान्य केली. या प्रकल्पाचे काम गोव्यात होईल तेव्हा काही पूलही बांधले जाणार आहेत. यावर खर्च किती येईल व किती प्रमाणात लोकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल, पुनर्वसन किती करावे लागेल हा सगळा तपशील यापुढे ठरणार आहे, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. आम्ही लोकांना नुकसान भरपाई निश्चितच देऊ, असे ते म्हणाले.
(खास प्रतिनिधी)