लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात मंत्रिमंडळ फेररचनेबाबतची चर्चा वाढलेली असतानाच काल नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिल्ली गाठली. त्यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. तसेच केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचीही राणे यांनी भेट घेऊन गोव्यातील विविध विषयांवर चर्चा केली.
विश्वजीत राणे यांच्याकडेही वन खाते आहे. भूपेंद्र यादव यांना भेटल्यानंतर काल रात्री विश्वजीत यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेतली. दोघांमध्येही चर्चा झाली. राजकीय विषयांबाबत ही चर्चा होती. गोव्यात तत्काळ आताच म्हणजे चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळ फेररचना होणार नाही, याची कल्पना विश्वजीत राणे यांना दिल्लीतील गाठीभेटींवेळी आली. नड्डा यांना अलिकडेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही भेटून आले होते. गोव्यातील राजकीय स्थितीवर नड्डा तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लक्ष आहे.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी आपली चर्चा ही वन विषयक गोष्टींबाबत झाली, असे मंत्री विश्वजीत राणे यांचे म्हणणे आहे. गोव्यात खारफुटीचे संवर्धन तसेच खारफुटीचे (मॅनग्रुवज) क्षेत्र वाढवावे, असे ठरले आहे. गोव्यात पाच लाख विविध प्रकारची झाडे लावण्याची मोहिमही हाती घ्यावी, अशी चर्चा ही झाली आहे. यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय सहकार्य करत आहे. राणे यांनी लोकमतला सांगितले की, भूपेंद्र यादव यांना आपण गोव्यात एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.