गोव्याचे मंत्री, आमदार रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत; १४०० रामभक्तही दाखल
By किशोर कुबल | Updated: February 15, 2024 12:27 IST2024-02-15T12:27:06+5:302024-02-15T12:27:35+5:30
मोपा विमानतळावरुन खास विमानाने २० हून अधिक आमदार अयोध्येला गेले आहेत.

गोव्याचे मंत्री, आमदार रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत; १४०० रामभक्तही दाखल
पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, आमदार सपत्निक प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत.
मोपा विमानतळावरुन खास विमानाने २० हून अधिक आमदार अयोध्येला गेले आहेत. सोमवारी रात्री गोव्यातून रेलगाडीने गेलेले सुमारे १४०० रामभक्तही अयोध्येत पोचले. मुख्यमंत्री व अन्य मंत्रीगण तसेच आमदार गोव्याहून गेलेल्या रामभक्तांसोबतच प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे तेथूनच दिल्लीला रवाना होणार असून पुढील तीन दिवस ते दिल्लीत असतील. उद्या शुक्रवारी गोव्यातील एसटी बांधवांच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेतील. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटतील. १७ व १८ रोजी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनालाही ते उपस्थित राहणार आहेत.