गोवा लोकायुक्त नियुक्ती लवकरच
By Admin | Updated: May 15, 2014 09:40 IST2014-05-15T00:58:13+5:302014-05-15T09:40:05+5:30
पणजी : मला दिल्लीच्या म्हणजेच राष्ट्रीय राजकारणात जाण्यात रस नाही व आपण तिथे जाणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

गोवा लोकायुक्त नियुक्ती लवकरच
पणजी : मला दिल्लीच्या म्हणजेच राष्ट्रीय राजकारणात जाण्यात रस नाही व आपण तिथे जाणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. राज्यात लोकायुक्तांची नियुक्ती करण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. पर्रीकर म्हणाले की, मी दिल्लीच्या राजकारणात जाईन अशा आशयाची वृत्ते वारंवार सर्वत्र प्रसिद्ध होत आहेत. मला कुणीच दिल्लीला येता का म्हणून विचारलेले नाही व विचारले, तरी मी राष्ट्रीय राजकारणात जाणार नाही. लोकायुक्त नियुक्तीबाबत पत्रकारांनी विचारले असता, पर्रीकर म्हणाले की, त्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावरील सुमारे बारा न्यायाधीश यापुढे निवृत्त होणार आहेत. गोवा लोकायुक्त कायद्यानुसार लोकायुक्तपदी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती यांचीच नियुक्ती करता येते. राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी सरकारने जे धोरण आखले आहे, त्या धोरणाबाबत शिक्षण खात्याने स्वत:चे मत नोंदवून ते धोरण कायदा खात्याकडे सल्ल्यासाठी पाठवावे व त्यानंतर अधिसूचना जारी करावी, यासाठी धोरणाची प्रत आपण शिक्षण खात्यास पाठवून देईन, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. खनिजाचा ई-लिलाव राज्य सरकारने करत राहाणे, हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. केंद्र सरकारचे एक पत्र गोव्याला मिळाले असून, भविष्यातही कायम खनिजाचा लिलाव सरकारने करावा, असे केंद्राला अपेक्षित आहे. त्यासाठी दिल्लीला बैठक बोलावली गेली आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने खाणींबाबतचे सगळे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत. तेव्हा लिलाव पुकारावा की नाही ते सांगणारे केंद्र सरकार कोण? अशी विचारणा आम्ही करू, असे पर्रीकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)