कोडिंग आणि रोबोटिक्स लागू करणारे गोवा हे पहिले राज्य: प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2024 08:47 IST2024-08-17T08:47:32+5:302024-08-17T08:47:49+5:30
कौशल्य विकासाला चालनेसाठी अभ्यासक्रमाचा समावेश

कोडिंग आणि रोबोटिक्स लागू करणारे गोवा हे पहिले राज्य: प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील माध्यमिक शाळा ते उच्च माध्यमिक शाळेपर्यंतच्या अभ्यासक्रमात कोडिंग आणि रोबोटिक्सचा समावेश करणारे पहिले राज्य म्हणून गोवा आघाडीवर आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. शहरातील जुन्या सचिवालयात ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात तिरंगा ध्वज फडकविल्यानंतर ते बोलत होते. १९ डिसेंबर २०२४ पर्यंत १०० टक्के साक्षरता साध्य करण्याच्या राज्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाचाही मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आणि शिक्षणात एसटीईएम, एआय आणि रोबोटिक्समध्ये प्रगती करण्यावर सरकारचा भर आहे असे सांगितले.
आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व आयटीआय आयएसओ प्रमाणित आहेत असे सांगितले. राज्य सरकारने पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान वाढविण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीशी भागीदारी केली आहे असेही ते म्हणाले. कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी सौर तंत्रज्ञान, अग्निशमन तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, औद्योगिक सुरक्षा आणि आदरातिथ्य व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रातील नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत असेही सावंत म्हणाले. राज्याच्या आर्थिक क्षेत्रात पर्यटन क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असल्याने मुख्यमंत्र्यांनी सर्व तरुणांना उद्योग क्षेत्रात विशेष प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक, गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, कामगार, महसूल आणि कचरा व्यवस्थापन मंत्री अतानासिओ मोन्सेरात, वीज मंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, हळदोनाचे आमदार कार्लोस फरेरा, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, आयएएस, विविध आयएएस सचिव, आमदार, स्वातंत्र्य सैनिक आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अनेकांचा करण्यात आला गौरव
यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालक नितीन व्ही. रायकर, जीवन रक्षा पदक पुरस्कार २०२४, वाळपईचे साहिल भिसो लाड, पीआय अरुण डी बाकरे आणि एएसआय महेश जी. सावळ यांना सार्वजनिक प्रशिक्षणात उत्कृष्टतेसाठी केंद्रीय गृहमंत्री पदक मिळाले. स्वातंत्र्यसैनिक सुरेश सुब्राय्या परोडकर कुंभारजुआ, फोंडा येथील स्व. परशुराम एस. शहापूरकर, स्व. पांडुरंग सगुण कुंडईकर, स्व. पुरुषोत्तम (पुरसो) चालू सावंत आणि डिचोलीचे स्व. वासुदेव यशवंत कुबल यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. एनआयसी तांत्रिक संचालक केव्ही रामनाथन यांना मुख्यमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उप वनसंरक्षक तेजस्विनी पुसुलुरी, आयएफएस, मुख्य विद्युत अभियंता स्टीफन फर्नांडिस, उपजिल्हाधिकारी (डीआरओ) विनायक चारी यांना प्रशंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वयंपूर्ण गोवा (सासष्टी २) अंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव वेनान्सियो फुर्तादो यांना गौरविण्यात आले. पर्यटन खात्याचे उपसंचालक धीरज आर. वागळे, वाहतूक खात्याचे अतिरिक्त संचालक संदीप देसाई, राज्यकर अधिकारी मेलविन फालेरो, सहाय्यक वनसंरक्षक दामोदर सालेलकर यांना सर्वोत्कृष्ट कार्य करणारे स्वयंपूर्ण मित्र म्हणून गौरविण्यात आले.