Goa: गोव्यातील घराघरात आता बंगळुरुची नव्हे, स्थानिक झेंडूंच्या फुलांची लागणार तोरणे!
By किशोर कुबल | Updated: August 18, 2022 14:56 IST2022-08-18T14:56:27+5:302022-08-18T14:56:49+5:30
Goa: दसरा, दिवाळी, चतुर्थी सणाला एवढेच नव्हे तर विवाह समारंभ व अन्य कार्यक्रमांच्यावेळी आरास करण्यासाठी गोेवेकरांना मोठ्या प्रमाणात लागणा-या झेंडूच्या फुलांसाठी आता अन्य राज्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही.

Goa: गोव्यातील घराघरात आता बंगळुरुची नव्हे, स्थानिक झेंडूंच्या फुलांची लागणार तोरणे!
- किशोर कुबल
पणजी - दसरा, दिवाळी, चतुर्थी सणाला एवढेच नव्हे तर विवाह समारंभ व अन्य कार्यक्रमांच्यावेळी आरास करण्यासाठी गोेवेकरांना मोठ्या प्रमाणात लागणा-या झेंडूच्या फुलांसाठी आता अन्य राज्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही. याबाबतीतही ‘स्वयंपूर्ण’ बनण्याचा विडा कृषी खात्याने उचलला असून झेंडू लागवडीसाठी हेक्टरी ७५ हजार रुपये सबसिडीच्या योजनेबाबत अधिक जागृती घडवून आणली जाणार आहे. गेल्या वर्षी २४ हेक्टर जमिनीत झेंडू लागवड झाली. हे प्रमाण यंदा ४0 हेक्टरच्या वर नेण्याचे उद्दिष्ट खात्याने ठेवले आहे.
कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आफोंसो यांनी ‘लोकमत’ला अधिक माहिती देताना म्हणाले की, ‘ दरवर्षी राज्यात सुमारे २ हजार मेट्रिक टन झेंडूची फुले आयात केली जातात. सरकारने स्थानिक शेतकºयांना लागवडीकरिता प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी जाहीर केली आहेच शिवाय रोपेही उपलब्ध करण्याची व्यवस्था केली आहे. खाजगी नर्सरींना बियाणी देऊन झेंडूची रोपे काढली जातात. ही रोपे नर्सरीमालक प्रत्येकी ४ ते ५ रुपयाने विकतो. केपें व डिचोली तालुक्यांमध्ये झेंडूंच्या फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. उर्वरित तालुक्यातील शेतकºयांनीही लागवडीसाठी पुढे यावे असे आवाहन आफोंसो यांनी केले. हेक्टरी ७५ हजार रुपये याप्रमाणे कमाल दोन हेक्टरपर्यंत दीड लाख रुपये सबसिडी दिली जाते.’
झेंडूंच्या फुलांची गोव्यात अगदीच कमी लागवड होते त्यामुळे सणासुदीच्या काळात बंगळुरु, बेळगांव तसेच अन्य ठिकाणहून ती मागवावी लागतात. प्रवासात तीन चार दिवस जातात तसेच हवामानही बदलल्याने फुले गोव्यात पोहचेपर्र्यत कोमेजून जातात. गोवेकर स्थानिक ताजी फुले शोधत असतात. थोडी महागही पडली तरी ती खरेदी करण्याची तयारी असते. परंतु स्थानिक झेंडूची फुले उपलब्ध होत नाहीत.’
गोव्यात लागवडीसाठी मोठा वाव - शिल्पा सावंत, प्रगत शेतकरी तथा नर्सरीमालक
वन-कासारवाडा, डिचोली येथील वत्सला नर्सरीच्या मालक प्रगत शेतकरी सौ. शिल्पा प्रभाकर सावंत म्हणाल्या की, ‘झेंडूची रोपटी उगवून ती मी कृषी खात्याला विकते. रोपट्याचा पाच रुपये दर असतो. यंदा सहा हजार बियाणी घातलेली आहेत. स्वयंसहाय्य गटामधील महिलांनाही मी याबाबत मार्गदर्शन करते. गोव्यात प्रत्येक सणाला झेंडूची फुले लागतात. लागवडीसाठी मोठा वाव असून शेतकºयांचे आर्थिक उत्पन्नही यामुळे वाढेल.’
शिल्पा सावंत या केवळ झेंडूचीच लागवड करतात असे नव्हे, तर हळदीचीही लागवड करतात. यंदा त्यांनी २0 किलो हळद लागवड केली आहे. नर्सरीमध्ये त्या गांडूळ खत निर्मितीही करतात. माणगांव येथे प्रशिक्षण घेऊन आलेल्या शिल्पा आंबा यावरही वर्ग घेतात.