Goa: पे पार्किंगवरुन आजी माजी महापौर जुंपले: दोघांनी केले एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप
By पूजा प्रभूगावकर | Updated: October 9, 2023 13:52 IST2023-10-09T13:51:58+5:302023-10-09T13:52:19+5:30
Goa News: पणजी शहरातील पे पार्किंग कंत्राट प्रक्रियेवरुन पणजी महानगरपालिके(मनपा)च्या बैठकीत महापौर रोहित मोन्सेरात व माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या जुंपली.

Goa: पे पार्किंगवरुन आजी माजी महापौर जुंपले: दोघांनी केले एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप
- पूजा नाईक प्रभूगावकर
पणजी: शहरातील पे पार्किंग कंत्राट प्रक्रियेवरुन पणजी महानगरपालिके(मनपा)च्या बैठकीत महापौर रोहित मोन्सेरात व माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या जुंपली. दोघांनी यावेळी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या गोंधळात पे पार्किंग कंत्राटाला मंजुरी दिली.
पणजीतील पे पार्किंग कंत्राट देण्यासाठीची प्रक्रिया मनपाने पाळली नाही. सदर विषय बैठकीत चर्चेला न घेताच पे पार्किंगसाठी निविदता मागवलीन , कंत्राट दिले. नियमांचे उल्लंघन करुन मनपा एका विशिष्ट व्यक्तीलाच हे कंत्राट देऊ पहात आहे. तुम्ही कंत्राट कुणालाही द्या मात्र ते नियमांनुसार द्या, प्रक्रिया पाळा अशी मागणी माजी महापौर फुर्तादो यांनी केली.
पे पार्किंग कंत्राटदार सोहम जुवारकर यांचे कंत्राट ऑगस्ट मध्ये संपुष्टात आले. असे असतानाही ते शहरात पे पार्कींग शुल्क वाहनचालकांकडून आकारत आहेत. हे बेकायदेशीर आहे. व आता पुन्हा एकदा त्यालाच हे कंत्राट सर्व नियम धाब्यावर बसवून कंत्राट दिले जात आहे. सदर प्रकार म्हणजे भ्रष्टाचार असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी महापौर मोन्सेरात यांनी सर्व प्रक्रिया ही नियमांनुसारच असून यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही. उलट तुम्ही महापौर असतानाच अनेक घोटाळे झाले आहेत.मनपाला महसूल वाढीची संधी असताना कमी दरात वेगवेगळ्या कामांसाठी निविदा मागवल्या असा आरोप त्यांनी केला. आरोप होताच मोन्सेरात व फुर्तादो यांच्यात जुंपली.