२0१५ पर्यंत गोवा कचरामुक्त !
By Admin | Updated: August 18, 2014 01:20 IST2014-08-18T01:11:47+5:302014-08-18T01:20:45+5:30
मुख्यमंत्र्यांची घोषणा : किनारे, नद्याही स्वच्छ होणार

२0१५ पर्यंत गोवा कचरामुक्त !
सावर्डे : सरकार पुढील डिसेंबर २0१५ पर्यंत गोवा कचरामुक्त करणार आहे. संपूर्ण राज्यातील सर्व समुद्रकिनारे, नद्या व इतर भागांत कचरा दिसणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली.
कुडचडे मतदारसंघातील काडा सभागृहात झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, आमदार नीलेश काब्राल, आमदार सुभाष फळदेसाई, आमदार गणेश गावकर, कुडचडेच्या नगराध्यक्ष कार्मेलिना फर्नांडिस, उपनगराध्यक्ष प्रदीप नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. कुडचडे येथील या मेळाव्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
पर्रीकर म्हणाले की, लोक घरातील कचरा पुलावरून पाण्यात टाकतात. आता तर पूल हे आत्महत्येचे केंद्र झालेले असल्याने पुलावर जाळ्या बसविण्याचा विचार करावा लागणार आहे. माणसाला अशा प्रकारचे विचार मनात का येतात, यावरही गंभीरपणे विचार करण्यात येईल. त्यासाठी समाजात चांगले ज्ञान देऊन अशा निर्णयापासून त्यांना परावृत्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आपणास भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांमुळे विजय प्राप्त झाल्याचे अॅड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. गोव्याचे जे प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी आपण संसदेत सर्व प्रकारचे प्रयत्न करणार आहे, त्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे, असेही ते म्हणाले.
काब्राल म्हणाले की, कोणत्याही कारणावरून खाण व्यवसाय जरी दोन वर्षांमागे बंद पडलेला असला तरी आता कायदेशीर व अधिकृत खाणी लवकरच चालू होणार आहेत. पर्रीकर यांनी गेल्या अडीच वर्षांच्या राजवटीत आम्हाला लोकांसमोर जाण्याचा धीर दिला. विविध योजनांद्वारे लोकांना दिलासा दिलेला असून, गृहआधार योजनेत वाढ करून १२00 रुपये केल्याचे त्यांनी सांगितले. कुडचडेतील काँग्रेसच्या ३४ समितींतील २0 कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने यापुढे येथे पक्ष बळकट झाल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी खासदार सावईकर यांचा सत्कार करण्यात आला. आशिष करमली यांनी सूत्रसंचालन केले. अशोक नाईक यांनी आभार मानले. (लोे. प्र.)